जिल्ह्यात सात शिवभोजन केंद्रे सुरू; अलिबागमध्ये २५० थाळ्यांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:12 PM2020-03-12T23:12:37+5:302020-03-12T23:26:50+5:30
पनवेलमध्ये ५ ठिकाणी केंद्रे सुरू
अलिबाग : रायगड जिल्ह्यात अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत सात शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात अलिबागमधील दोन तर पनवेलमधील पाच शिवभोजन केंद्रांचा समावेश आहे. गरीब आणि गरजू लोकांना दहा रुपयांत जेवण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्यभरात शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात सुरुवातीला अलिबाग येथे दोन शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती. आता पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण पाच शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात दररोज ८०० गरीब आणि गरजूंना शिवभोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन आहार योजना सुरू केली आहे. दुपारी १.०० ते २.०० या वेळेत भोजन उपलब्ध होईल.
अलिबाग येथील दोन शिवभोजन केंद्रांसाठी २५० थाळ्यांची संख्या मंजूर करण्यात आली आहे. तर पनवेलमधील पाच शिवभोजन केंद्रांसाठी ५५० थाळ्यांची संख्या मंजूर करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच भोजनालयातून बाहेर जेवण घेऊन जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे.