वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण विशेष म्हणजे कोंकण वासियांसाठी या सणाचे विशेष महत्व आहे.याकरिताच चाकरमानी आवर्जुन गणेशोत्सवासाठी आपली आवर्जुन हजेरी गावच्या गणपतीला लावत असतात.पनवेल बस डेपो मध्ये शनिवारी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पहावयास मिळाली. कोंकणात जाणाऱ्या शेकडो गाड्या पनवेल आगारातून जात असतात.
यावर्षी पनवेल आगारातुन सात विशेष गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये कणकवली, रत्नागिरी, दापोली, देवरुख, देवडे प्रत्येकी एक आणि तुटबंदी दोन अशा सात विशेष गाड्या यावेळी पनवेल आगारातून दिवसभरात सोडण्यात आल्या.या व्यतिरिक्त महाडला नियमित जाणाऱ्या 9 गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. दि.17 रोजी 4 आणि दि.18 रोजी 3 विशेष बस कोंकणाकडे जाणार असल्याची माहिती पनवेल बस आगाराचे व्यवस्थापक सुजित डोळस यांनी दिली. गणेशोत्सवाला दि.19 मंगळवारी सुरुवात होता आहे. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने चाकरमान्यांनी या दोन दिवसात गाव गाठण्याचे ठरवले असल्याने एसटी बसेसह, रेल्वे स्थानक या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.मुंबई वरून सुटणाऱ्या विशेष रेल्वे पनवेल मध्ये थांबत असल्याने पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. पुढील तीन दिवस हि गर्दी कायम राहणार आहे.
प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे गणपती स्पेशल ट्रेनची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. एकीकडे रेल्वेगाड्या फुल होत आहेत तर दुसरीकडे एसटीचेही आरक्षण फुल झाले आहे.