अलिबागमध्ये सेक्स रॅकेट चालविणारे सात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:28 AM2018-10-29T03:28:33+5:302018-10-29T03:29:47+5:30
पुण्यातील ११ मुलींची सुटका; आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
- जयंत धुळप
अलिबाग : मुलींना पर्यटनाच्या नावाखाली पुण्यातून अलिबाग येथे आणून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पाच जणांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली. शनिवारी रात्री अलिबागमधील तीन हॉटेलवरील छाप्यात, पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथील दोन महिला दलाल, दोन वाहनचालक आणि अलिबागमधील तिघा हॉटेल व्यावसायिकांसह ११ पीडित मुली, महिलांना ताब्यात घेण्यात आले.
रविवारी दुपारी सर्वांना न्यायालयात हजर केले असता, पाचही आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर ११ पीडितांना सुधारगृहात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हॉटेल विठोबा-रुक्मिणी कॉटेज, हॉटेल रविकिरण आणि हॉटेल मीरामाधव येथे सापळा रचून बनावट गिºहाईक पाठवून खातरजमा केल्यावर छापे टाकण्यात आले. कल्पना केशव मेंगडे (रा. शनिवार पेठ, तळेगाव-दाभाडे) आणि किरण राजू साळुंखे (रा. परमार पार्क, पुणे) व वाहनांचे चालक विश्वनाथ ज्ञानेश्वर ठाकर (रा. मालेगाव) व शिवाजी राम शिंदे (रा. निगडी-पुणे) यांच्यासह ११ पीडितांना ताब्यात घेण्यात आले, असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.
गुन्हा दाखल
हॉटेल व्यवसाय करताना पर्यटकांची योग्य नोंद रजिस्टरमध्ये करून न घेता त्यांना रूम्स दिल्या कारणास्तव हॉटेल व्यावसायिक प्रसाद नागवेकर, नीलेश राऊळ व मिथुन कामत यांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे.ए. शेख यांनी दिली.