दासगाव /महाड : रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामध्ये वीर गावातील तीन घरांचे तर दासगावमध्ये एक घराचे नुकसान झाले. वीर ते दाभोळ या गावापर्यंत ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने सात गावांतील अनेक वाड्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले.रविवारी अचानक महाड तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळाला तडाखा एवढा मोठा होता की, संपूर्ण तालुका हादरून गेला होता, तर काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जोराच्या वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच विजेचे खांब जमीनदोस्त झाली. याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागला. तालुक्यातील वीर गावामध्ये वामन भोईर, नजमुन्नीस अधिकारी व पांडुरंग भोईर या तिघांच्या घरावर मोठी सागवानाची झाडे कोसळली. यामध्ये वामन भोईर यांचे घर संपूर्ण जमीनदोस्त झाले, तर इतर दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच दासगावमध्ये देखील शंकर निवाते यांच्या घरावर सागवानाचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. या नुकसानीचा दासगाव सजेचे तलाठी संदेश पानसारे यांनी पंचनामा केला असून अंदाजे दासगाव आणि वीर या दोन्ही ठिकाणचा घरांचे अंदाजे नुकसान एक लाख सात हजार आठशे असल्याचे सांगितले. मात्र या चौघांमध्ये वामन भोईर यांचे जास्त नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही ठिकाणच्या चारही घरांवर सागवानाचेच झाड कोसळल्याचे दिसून येत आहे.रविवारी झालेल्या वादळी वाºयामुळे वीर गावामध्ये विजेचे खांब कोसळले तर वीरपासून दाभोळ या गावहद्दीपर्यंत विजेचे अनेक खांब जमीनदोस्त झाले. याचाफटका केंबुर्ली, वहूर, दासगाव, वीर, टोळ, सापा, दाभोळ या अंतरात असलेल्या अनेक वाड्यांना बसला व या गावांना रात्र अंधारात काढावी लागली.सव आदिवासी वाडीत तीन बक-या गेल्या वाहूनविजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात कोसळलेल्या पावसामुळे सव येथे घरांची पडझड झाली असून सव आदिवासी वाडीतील एका घरात नाल्याचे पाणी घुसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन बकºया वाहून गेल्या. सव आदिवासी वाडीतील संतोष वाघमारे, चंदन वाघमारे, शेवंता वाघमारे, व शंकर वाघमारे यांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या वादळामुळे तालुक्यात अन्य अनेक घरांचे छप्पर उडून गेले तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडलेली आहेत. वादळी पावसामुळे महाड शहरासह तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.महाड येथे सर्वाधिक ९६.७० मिमी पाऊस अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड व माणगाव तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ९६.७० मिमी पावसाची नोंद महाड येथे झाली तर त्या खालोखाल ९३ मिमी पावसाची नोंद माणगाव येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पोलादपूर येथे २७ मिमी, सुधागड येथे २१, तळा येथे १८, म्हसळा १७ मिमी तर मुरु ड, कर्जत, खालापूर, रोहा, श्रीवर्धन व माथेरान येथे केवळ दोन मिमी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग, पेण, पनवेल व उरण येथे शून्य पावसाची नोंद झाली असली तरी वेगवान वा-यांमुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.रात्री उशिरा तीव्र जलढग महाबळेश्वर व सातारा या दिशेने सरकल्याने रायगड जिल्ह्यात आज पावसाचा जोर नव्हता. तुरळक ठिकाणी मात्र पावसाच्या सरी पडल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
वादळी पावसाचा महाडला तडाखा, वीर, दासगावमध्ये घरांचे नुकसान, विजेचे खांब कोसळल्याने सात गावे रात्रभर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 6:26 AM