प्रद्युम्न म्हात्रेची साता समुद्रापार भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:01 PM2019-12-31T23:01:25+5:302019-12-31T23:01:40+5:30
किक बॉक्सिंगमध्ये यश; आतापर्यंत १४६ सुवर्ण पदकांची कमाई
- आविष्कार देसाई
अलिबाग : जगभरात विविध खेळ खेळले जातात. असे खेळ खेळणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. त्यामध्ये प्रत्येकालाच यश प्राप्त होतेच असे नाही मात्र प्रचंड जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर यश खेचून आणतात तोच खरा सिकंदर होतो. सध्या कराटे हा झपाट्याने लोकप्रिय होत असलेला खेळ आपल्याकडेही विकसित झाला आहे. किक बॉक्सिंगही त्यातीलच एक प्रकार आहे. याच किक बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत प्रादेशिक पातळी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर तब्बल ९५ सुवर्णपदक, ३३ रौप्य आणि १८ कांस्यपदक पटकवण्याचा पराक्रम पनवेलमधील सीकेटी हायस्कूलचा विद्यार्थी प्रद्युम्न अशोक म्हात्रे याने आपल्या नावावर केला आहे. आज यश, कीर्ती, मानसन्मान त्याच्या पायात लोळण घालत आहे. मात्र यशाची हवा डोक्यात जाऊ न देता जमिनीवर राहून यशो शिखरावर तो उत्तुंग भरारी घेत आहे.
सर्वसामन्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला प्रद्युम्न हा अशोक आणि कविता म्हात्रे यांचा धाकटा मुलगा आहे. घरात खेळाचा तसा वारसा नसतानाही त्याला खेळाची आवड सुरुवातीपासूनच होती परंतु प्रद्युम्नच्या आईला कराटेची आवड होती. त्यांचेच गुण प्रद्युम्नमध्ये उतरले असावेत. प्रद्युम्नला कराटे प्रकारातील किक बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. युनायटेड शुटोकान कराटे असोसिएशन भारत या संस्थेचा तो सभासद आहे. त्याच्या खेळामध्ये स्पार्क असल्याचे घरच्यांबरोबरच शाळेतील शिक्षक आणि असोसिएशनने चांगलेच हेरले होते. त्यासाठी त्याला तिन्ही स्तरावरुन उत्तेजन आणि मार्गदर्शन मिळत गेले.
प्रद्युम्न सध्या सीकेटी हायस्कूलमध्ये इयत्ता १२ विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील अशोक हे अलिबाग नगरपालिकेमध्ये पाणी विभागात नोकरीला आहेत. वडील अशोक आणि आई कविता यांनी प्रणव आणि प्रद्युम्न या दोन्ही मुलांच्या पालन पोषणात कोणतीच कमतरता पडू दिली नाही. अभ्यासाबरोबरच त्यांच्यातील खेळालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले. प्रणवलाही कराटेची आवड होती, मात्र त्याने पुढे खेळ थांबवला परंतु प्रद्युम्नला कराटेशिवाय दुसरे काहीच सुचत नसल्याने त्याने अभ्यासाबरोबरच आपल्या खेळालाही तितकेच महत्त्व दिले.
प्रद्युम्नचे कराटेचे प्रशिक्षक प्रशांत गांगुर्डे, शाळेतील शिक्षक अरुण पाटील, मनोज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे. खेळासाठी प्रद्युम्नला विविध राज्यात तसेच परदेशातही जावे लागते. त्यावेळी त्याला शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक समजून घेतात. आपल्या शाळेचे, देशाचे नाव प्रद्युम्न सातासमुद्रा पार उज्ज्वल करत आहे. यापेक्षा अभिमानाची कोणती मोठी गोष्ट असणार.
आंतरराष्ट्रीय स्तरावर यश
प्रद्युम्नने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर (रशिया, थायलंड, नेपाळ) पाच सुवर्णपदके आणि दोन रौप्यपदके प्राप्त केली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर १६ सुवर्णपदके, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.
राज्यस्तरावर त्याने चमकदार कामगिरी केली आहे. २६ सुवर्णपदक, चार रौप्य आणि सहा कांस्य, जिल्हा स्तरावर १९ सुवर्णपदक, ११ रौप्य आणि चार कांस्य, तर प्रादेशिक स्तरावर तब्बल २९ सुवर्णपदक, १४ रौप्य आणि सात कांस्यपदक अशी एकूण १४६ पदके मिळवली आहेत.
आमच्या मुलाला असेच यश मिळत राहो. पराभवामुळे कधीच खचू नकोस असे त्याला नेहमीच सांगत असल्याचे प्रद्युम्नचे वडील अशोक आणि आई कविता यांनी लोकमतला सांगितले. त्याला खेळात करीअर करायचे आहे. आम्ही त्याला कधीच अडवले नाही. खूप बक्षीस मिळवूनही त्याच्या डोक्यात हवा गेलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रद्युम्नचा गेम हा बघण्यासारखाच असतो. त्यांनी केलेली मेहनत नेहमीच फळाला येते आणि सुवर्णपदक तो आणतोच मार्शल आर्टमधील सर्व खेळावर त्याचे प्रभुत्व आहे. लवकरच किक बॉक्सिंगला मान्यता मिळाल्यावर तो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक निश्चितपणे आणणार असा विश्वास आहे.
- प्रशांत गांगुर्डे, प्रशिक्षक
तुमचा फोकस क्लीअर असला पाहिजे, तरच तुम्हाला यशाला गवसणी घालता येईल, अभ्यासाबरोबरच तुम्हाला कोणता खेळ आवडतो याकडे लक्ष द्या. अपयश येत असेल तर सातत्याने प्रयत्न करा यश नक्कीच मिळते. मात्र यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असेही त्याने सांगितले.
-प्रद्युम्न म्हात्रे
६५ वी राष्ट्रीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत पंजाबमधील संगरु र इथे पार पाडली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व प्रद्युम्नने केले.
८० किलोवरील गटामध्ये त्याने सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याचे वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष म्हात्रे उपाध्यक्ष, मंदार पनवेलकर, सचिव प्रविण काळे यांनी त्याचे अभिनंदन केले. आता तो हिमाचल प्रदेश येथे होणाºया शालेय युनी फाईट स्पर्धेत खेळणार आहे.