महाड दुर्घटनेत सात कामगार ठार, चौघांचा शोध अद्याप सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 09:10 AM2023-11-05T09:10:02+5:302023-11-05T09:10:15+5:30
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील सर्व कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटविणे शक्य नसल्याने, ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असून, तेथे डीएनए तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
- सिकंदर अनवारे
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील औषधनिर्मिती कारखान्याला शुक्रवारी भीषण स्फोट झाला होता. त्यामुळे कारखान्याला आग लागून ११ कामगार बेपत्ता होते. त्यातील सात जणांचे मृतदेह शनिवारी सापडले. इतर चौघांचा शोध अद्याप सुरू आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील सर्व कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटविणे शक्य नसल्याने, ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असून, तेथे डीएनए तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. मदतकार्यास वेग आणण्याकरिता प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी त्यांनी अडकलेल्या कामगारांच्या नातेवाइकांची आणि जमा झालेल्या ग्रामस्थांचीही भेट घेऊन त्यांना शांत राहण्याचे
आवाहन केले.
आर्थिक मदत जाहीर
मृत कामगारांना कंपनी प्रशासनाने प्रत्येकी ३० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरी अशी मदत जाहीर केली आहे. जखमींना रुग्णालयाचा खर्च आणि एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. शासनाकडूनही मृतांना पाच लाख रुपये मदत जाहीर केल्याचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले.
एकुलता एक गमावला
किल्ले रायगडावर जायचे, म्हणून दुपारऐवजी सकाळच्या सत्रात येणाऱ्या आदित्य मोरे (२२) याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. मोरे याचे वडील मेडिकलमध्ये काम करतात. एकुलत्या एका मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सतीशचे स्वप्न अपूर्णच
सतीश साळुंखे याने नवी संधी मिळण्याच्या आशेने कंपनी जॉइन केली. ती जॉइन करून अवघे दोनच दिवस झाले होते. या कंपनीतून नवी आशा पाहणाऱ्या सतीशचे स्वप्नही अपूर्णच राहिले.