सातव्या दिवशी २१ नामनिर्देशनपत्रे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:22 AM2019-01-09T03:22:47+5:302019-01-09T03:23:01+5:30
कर्जत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक : बुधवारी शेवटचा दिवस
कर्जत : कर्जत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ जानेवारी रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी २१ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. बुधवारी २ जानेवारीपासून ९ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करायची आहेत. मंगळवारी ८ जानेवारी रोजी सातव्या दिवशी २१ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ८३ जणांनी आॅनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे.
आतापर्यंत एकूण १५१ जणांनी आॅनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. शिवसेना- आरपीआय युतीच्या नगराध्यक्ष पदासह १८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र, भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने आणि भारिपच्या दोन उमेदवारांनी चार नामनिर्देशन पत्र अशी एकूण २१ उमेदवारांनी २३ नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्याकडे सादर केली. शिवसेना - आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी कर्जत शहरात मिरवणूक काढून मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात दाखल झाले. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी यांनी कर्जत शहरात शक्तिप्रदर्शन करून आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, कर्जत - खालापूर विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, युवा सेना जिल्हाधिकारी मयूर जोशी, शहर प्रमुख भालचंद्र जोशी, आरपीआयचे प्रदेश सचिव मारु ती गायकवाड, शहराध्यक्ष अरविंद मोरे, आरपीआय महिला आघाडी कर्जत शहर अध्यक्ष वैशाली भोसले आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक, भीमसैनिक उपस्थित होते.
आज नगरसेवक पदासाठी राहुल डाळिंबकर, मोहन भोईर, मयुरी गजमल, अरुणा वायकर, प्राची डेरवणकर, यमुताई विचारे, शुभांगी कडू, संकेत भासे, गजेंद्र दांडेकर, सतीश पाटील, सरिता मोरे, त्रिशरण गायकवाड, मनीषा भासे, पूनम बोबडे, नितीन सावंत, महेंद्र कानिटकर, अभिषेक सुर्वे, राकेश शेट्टी, वैशाली मोरे, साक्षी पाटील यांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. बुधवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे शिवसेना - भाजपा - आरपीआय युती शंभर टक्के होणार असे सांगत असले तरी नामनिर्देशन पत्र दाखल करताना शिवसेना - आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्तेच उपस्थित होते. त्यामुळे युतीबद्दलचा संभ्रम काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व कर्जतकरांना देखील पडला आहे.