चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत; राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:20 AM2019-06-07T00:20:37+5:302019-06-07T00:20:45+5:30

सुरुवातील प्रिया ढवळे यांना सरपंचपदासाठी देऊ केलेली उमेदवारी मागे घेत परेश यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज ढवळे यांनी शेकाप आणि चेंढरे परिवर्तन आघाडीच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले आहे

Seventh Tripura clash in Gram Panchayat; Political developments speed | चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत; राजकीय घडामोडींना वेग

चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत; राजकीय घडामोडींना वेग

Next

अलिबाग : चेंढरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणारे दत्ता ढवळे यांच्या पाठोपाठ शेकापचे कार्यालयीन जिल्हा चिटणीस परेश देशमुख यांनीही शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चेंढरे परिवर्तन आघाडीची मोट बांधणारे ढवळे यांच्या पत्नीची सरपंचपदाची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या ढवळे यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल करताना अन्य सदस्यांना उमेदवारी देत स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उभे केले आहे, त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.

चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये सध्या शेकापची सत्ता आहे. शेकापला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य दत्ता ढवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत चेंढरे परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली. सरपंचपदासाठी सुरुवातीला ढवळे यांच्या पत्नी प्रिया ढवळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, काही वेगाने राजकीय घडामोडी घडत शेकापचे परेश देशमुख यांनी शेकाप सोडत भाजपच्या तंबूत प्रवेश केला.

त्यामुळे सुरुवातील प्रिया ढवळे यांना सरपंचपदासाठी देऊ केलेली उमेदवारी मागे घेत परेश यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज ढवळे यांनी शेकाप आणि चेंढरे परिवर्तन आघाडीच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले आहे. गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकाप, परिवर्तन आघाडी यांच्यासह ढवळे यांनीही आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. ढवळे यांचा परिवर्तन आघाडीला पाठिंबा राहण्याचे मनसुबे त्यामुळे धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.

अर्ज मागे घेण्याची १० जून ही अंतिम तारीख आहे. शेकापचे परेश देशमुख हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी सरपंचपदही भूषवलेले आहे. त्यामुळे शेकापच्याच मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ज्यांच्या पुढाकाराने चेंढरे परिवर्तन विकास आघाडी अस्तित्वात आली होती. ते दत्ता ढवळेच बाहेर पडल्याने आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार ढवळे यांनी बोलून दाखवल्याने राजकीय पेच चांगलाच वाढला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अजून राजकीय घडामोडी घडणार असल्याने राजकीय चुरस अनुभवास मिळणार आहे.

१० सरपंच आणि २६३ सदस्यपदासाठी होणार पोटनिवडणूक
अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायत, पेण तालुक्यातील रावे, पनवेल तालुक्यातील चावणे, जांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायत, उरण तालुक्यातील गोवठणे, आवरे ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील मुरु ड ७, पेण २२, पनवेल १९, उरण, कर्जत, खालापूर प्रत्येकी ५, रोहा ८, सुधागड, माणगाव, तळा प्रत्येकी १७, महाड ६२, पोलादपूर २९, श्रीवर्धन २८, म्हसळा २२ अशा २६३ ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक आहे.

शेकापमधून भाजपात प्रवेश केलेले परेश देशमुख यांनी अद्यापही शेकापच्या जिल्हा कार्यालयीन चिटणीसपदाचा तसेच आरडीसीसी बँकेसह अन्य महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिलेला नाही. तसेच शेकापनेही त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षासह अन्य महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी केलेली नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी चांगलीच चर्चा रंगली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार अर्ज, सदस्य पदासाठी ५९ अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पाच अर्ज, सदस्य पदासाठी ५८ अर्ज दाखल करण्यात आले.

Web Title: Seventh Tripura clash in Gram Panchayat; Political developments speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.