खोपोली : खालापूर तालुक्यातील सारसन येथील फ्रीगोरिफिको अल्लाना प्रा.लि. या कंपनीत रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आॅइल रिफायनरी प्लॅन्टमध्ये भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कंपनीत सुमारे १०० कामगार काम करीत होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
थोड्याच वेळात आगीने भयाण रूप धारण केले. आजूबाजूचा परिसर काळ्या धुरात लुप्त झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तम गॅलव्हा कंपनी, खोपोली नगरपालिका, एचपीसीएल, आयएनएस शिवाजी, लोणावळा, कर्जत नगरपालिका, पेण नगरपरिषद, रिलायन्स कंपनी, आयआरबी कंपनीच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे सुमारे अडीच तासांनी ही आग नियंत्रणात आली.
आगीचे वृत्त समजताच तहसीलदार एन. बी. चपलवार, विभागीय पोलीस अधीक्षक रणजित पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रंगराव पवार यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्यात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीत अग्रेसर होते.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अडीच तास धुमसत असलेली ही आग विझवण्यात अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.