सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असून देखील कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता - राज्यपाल रमेश बैस
By वैभव गायकर | Published: March 27, 2023 04:39 PM2023-03-27T16:39:43+5:302023-03-27T16:40:03+5:30
पनवेल मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाचे भूमिपूजन
पनवेल- भारतामध्ये जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे. तरीही भारतीय उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करीत आहेत. श्रम ब्युरोच्या 2014 च्या अहवालानुसार रोजगार क्षमतेसाठी आवश्यक कौशल्याच्या अभावामुळे भारतातील औपचारिकपणे कुशल कर्मचार्यांचा सध्याचा आकार केवळ 2 टक्के आहे. याशिवाय पारंपारिक शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या मोठ्या वर्गाला रोजगार देण्याचे आव्हानही आपल्या सर्वांच्या समोर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी दि.27 रोजी पनवेल येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूच्या भूमीपूजन समारंभावेळी केले.
राज्यपाल बैस पुढे म्हणाले की, भारतीय शिक्षण प्रणाली तल्लख बुद्धी असलेली पिढी निर्माण करीत आहे, परंतु त्यात विशिष्ट नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून बाहेर पडणारी प्रतिभा आणि त्यांची क्षमता आणि रोजगारक्षम कौशल्यांच्या दर्जाच्या बाबतीत त्यांची योग्यता यामध्ये खूप अंतर असल्याचे बैस यांचे म्हणणे आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच विक्रमी वेळेत महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल महाराष्ट्र कौशल्य विकास विभागाचे, या विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
प्रशिक्षित मानव संसाधन ही आवश्यक बाब आहे आणि याकरिता कौशल्य विकास या विभागाची जबाबदारी खूप मोठी आहे. महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाची वास्तू आदर्शवत अशीच असेल. महाराष्ट्र राज्य आयटीआय आणि उद्योगाची मोठ्या प्रमाणावर सांगड घालणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.लवकरच नवी मुंबईत स्टार्टअप हब सुद्धा सुरू करणार असून या कौशल्य विद्यापीठाच्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवश्यक सोयीसुविधांसाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी आश्वासित केले.
आपले मनोगत व्यक्त करताना राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी कौशल्य विकास आणि उद्योग यांची योग्य प्रकारे सांगड घातल्यास महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या देशाचेही भवितव्य निश्चितच उज्वल असेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठ सुरू करण्यासाठी पनवेलची निवड करण्यात आली. पनवेल आयटीआयचा १० एकर जागेची निवड विद्यापिठाचा कँम्पस तयार करण्यासाठी केल्यामुळे वर्षांनुवर्षे धोकादायक इमारतीत सुरू असलेल्या पडझड झालेल्या आयटीआयला देखील यामुळे नवी इमारत मिळणार आहे. कौशल्य विद्यापिठ उभे करण्यासाठी पनवेलची निवड केली नसती तर आयटीआयच्या नव्या इमारतीचा शुभारंभ देखील झाला नसता. पनवेल संघर्ष समितीचे कांतीलाल कडू यांनी अनेक वर्षे आयटीआयच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून इमारत नव्याने तयार व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.