महाडमधील केंबुर्ली गावात भीषण पाणीटंचाई; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:58 AM2020-05-29T00:58:45+5:302020-05-29T00:58:58+5:30
दासगाव-वहूर नळपाणीपुरवठा बंद झाल्याने समस्या
दासगाव : महाड शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या केंबुर्ली गावामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. केंबुर्ली गावातील होळीचा माळाची हीच अवस्था झाली असून या ठिकाणीदेखील पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसून दासगाव-वहूर नळपाणीपुरवठा बंद असल्याने पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या परस्थितीमध्ये संपूर्ण गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
केंबुर्ली गावाला कोथुर्डे धरणातून नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नेहमी वीज बिल तक्रार, कोथुर्डे धरणातून सोडण्यात येणारे पाणी अशा अनेक समस्यांना या गावाला सामोरे जावे लागते. ऐन उन्हाळ्यात कोथुर्डे धरणाची पातळी घटते. याचा फटकाही कायम बसतो. कोथुर्डे धरणातून या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात असला तरी वारंवार पाणी समस्या, वीज बिल समस्या निर्माण होत असल्याने दरवर्षी या गावाचा डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद राहतो. या गावातील दोन्ही विहिरी मे महिन्याच्या आतच आटून जातात. त्यामध्ये एक विहीर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी इतर पाण्याचे कोणतेच स्रोत नसल्याने केंबुर्ली गावाला पाण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नाही.
या गाव हद्दीतून दासगाव गावाला जाणाऱ्या नळपाणीच्या पाइपलाइनमधून थेंबेथेंबे करून रात्र घालवून संपूर्ण गाव पाणी भरण्याचे. मात्र आता दासगाव नळपाणीपुरवठा ठप्प झाल्याने या ठिकाणी टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. केंबुर्ली गावाला ही समस्या गेल्या वीस वर्षांपासून भेडसावत आहे. येथे प्रशासन, राजकीय लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गावाची ही परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी यूएफआय कमिटी तयार केली असून या कमिटीमार्फत टँकरद्वारे गावामध्ये पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांना आधार मिळाला आहे.
कोथुर्डे धरणाचे पाणी बंद झाले की केंबुर्लीला भीषण पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन विहिरी बांधून देणे किंवा बोअरवेल देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा याकरिता पंचायत समितीकडे मागणी केली आहे. शिवाय महाड एमआयडीसीकडूनही पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जावा याकरिता मागणी केली आहे.
- सादिक घोले, सरपंच, केंबुर्ली