दासगाव : महाड एमआयडीसीतील सांडपाणी वाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांना गळती लागली आहे. त्यातच टेमघर गावातील रस्त्यावर सी.ई.टी.पी. केंद्राजवळ शुक्र वारी रात्री सांडपाणी वाहिनीचे चेंबर भरल्याने पाणी रस्त्यावर आले. यापूर्वी दोन वेळा असे प्रकार घडले आहेत. एमआयडीसीने सांडपाणी वाहिनी साफ केली असली तरी महिन्याभरात दुसऱ्यांदा पाणी रस्त्यावर आल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर रस्त्यालगत सांडपाणी वाहिनी आहे. या रस्त्यावर किमान पाच कारखाने आहेत. यातील सांडपाणी या वाहिनीच्या माध्यमातून सामाईक सांडपाणी केंद्रात येत असते. या ठिकाणी असलेल्या चेंबरमधून काही दिवसांपूर्वी सांडपाणी बाहेर आले होते. यातील स्लज स्वरूपातील घनकचरा बाहेर काढण्यात आला आणि वाहिनी पूर्ववत करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच पुन्हा एकदा या मार्गावरील चेंबरमधून सांडपाणी बाहेर पडल्याने हे पाणी रस्ता आणि शेजारील टेमघर नाल्यात गेले. या वेळीदेखील ही पाइपलाइन घन कचºयाने बंद झाली असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.
सांडपाणी वाहिनी जुनी असून, केवळ १ फूट व्यासाची आहे. पूर्वीपेक्षा महाड एम.आय.डी.सी.मध्ये कारखाने वाढले आहेत. शिवाय, कारखान्यांचे विस्तारीकरणदेखील झाले आहे. यामुळे कारखान्यातून बाहेर पडणाºया पाण्याचे प्रमाणदेखील वाढले असले तरी ही वाहिनी मात्र कमी क्षमतेची आहे. यामुळे पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर पाइपलाइनला असलेल्या चेंबरमधून हे पाणी बाहेर रस्त्यावर येत आहे. महाड सी.ई.टी.पी.मधून पाणी ओवळे गावानजीक खाडीत सोडले जाते. ही पाइपलाइनही जुनी आणि जीर्ण झाली आहे. यामुळे या परिसरात कायम गळती होऊन शेतीचे नुकसान झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हे चित्र एम.आय.डी.सी.तच दिसू लागले आहे. औद्योगिक परिसरात विविध ठिकाणी चेंबरमधून पाणी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. मात्र, महाड एम.आय.डी.सी. आपली जबाबदारी झटकून प्रदूषण मंडळावर बोट दाखवत आहे.कंपन्यांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आहे. त्यांनी सांडपाणी वाहिनीची पाहणी करून असा प्रकार का होत आहे, हे शोधले पाहिजे.- प्रकाश ताटे, क्षेत्र अधिकारी,प्रदूषण मंडळ, महाडएमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या सांडपाण्यात घन पदार्थाचे प्रमाण अधिक आहे, यामुळे ही पाइपलाइन तुंबते, यामुळे पाणी चेंबरमधून बाहेर पडत आहे. प्रदूषण मंडळाने याचा शोध घ्यावा.- पी. एस. ठेंगे,उपकार्यकारी अभियंता