शिवथरघळीतील खडकाची झीज
By admin | Published: July 17, 2017 01:24 AM2017-07-17T01:24:24+5:302017-07-17T01:24:24+5:30
महाड तालुक्यातील शिवथरघळ या दासबोध ग्रंथाच्या निर्मिती ठिकाणावरील घळीला मुख्य आधार असलेल्या खडकाची झीज होत
लोकमत न्यूज नेटवर्क
बिरवाडी/महाड : महाड तालुक्यातील शिवथरघळ या दासबोध ग्रंथाच्या निर्मिती ठिकाणावरील घळीला मुख्य आधार असलेल्या खडकाची झीज होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दासबोध ग्रंथाचे जन्मस्थान असलेल्या शिवथरघळ येथील श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या देखरेखीखाली असणाऱ्या समर्थ रामदास स्वामी यांच्या या घळीला आधार देणारे नैसर्गिक दगडाच्या खांबांची दिवसेंदिवस झीज होत आहे. त्यावर वेळीच योग्य ती उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच जुन्या दगडी भिंतीला देखील तडे गेल्याने याठिकाणी या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे महाड तालुक्यातील वरंध जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती याचठिकाणी केली होती. याठिकाणी समर्थ रामदास व कल्याण स्वामी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सन १९३० मध्ये या घळीचा शोध लागला आहे. तेव्हापासून याठिकाणी दरवर्षी हजारो भाविक व पर्यटक या घळीला भेट देत असतात. मात्र या घळीच्या नैसर्गिक आधार असलेल्या खडकाची झीज होत असल्याने भूगर्भ वैज्ञानिकांकडून कुंभेशिवथर येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या घळीची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी राजिप सदस्य मनोज काळीजकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे महाड येथील उपअभियंता एस. जी. शिर्के यांच्याशी संपर्कसाधला असता महाड पंचायत समितीच्या ३0 जून रोजी झालेल्या शिवथरघळ येथील मासिक सभेमध्ये याविषयी चर्चा झाली असून सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळ सुंदरमठ उपसमिती यांनी याबाबत तातडीने लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे शिर्केयांनी स्पष्ट केले आहे.