जयंत धुळप यांना ‘सावली गौरव’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:11 AM2018-06-27T02:11:03+5:302018-06-27T02:11:10+5:30
सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अलिबाग : सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बदलापूर येथील मोरे मंगल कार्यालयात रविवारी आयोजित कार्यक्रमात बदलापूर महापालिकेचे आरोग्य सभापती श्रीधर पाटील, अॅड. अण्णासाहेब सावंत महाड को-आॅप अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.विनोद देशमुख, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, साहित्यआभाच्या संपादिका शारदा धुळप, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, सावलीचे संस्थापक अध्यक्ष गणराज जैन, डॉ. अर्चना जैन, डॉ.अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
काळानुरूप बदलत गेलेल्या पत्रकारितेचा लेखाजोखा यावेळी चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मांडला. पत्रकारिता करताना आपण करीत असलेल्या कामावर निष्ठा असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सावली सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणराज जैन यांनी संस्थेच्या स्थापनेची माहिती देऊन आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी जयंत धुळप यांच्या पत्रकारितेतील विविध बातम्या आणि प्रसंगांचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले आणि धुळप यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. साहित्यआभाच्या संपादिका शारदा धुळप आणि जयंत धुळप यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात बदलापूर येथे सफर प्राणी सुश्रुषा केंद्राकरिता जागा उपलब्ध करून देणारे म्हात्रे कुटुंबीय, गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली बदलापूरची स्केटिंगबेबी निष्का यादव आणि अभिनेत्री मृणाल चेंबूरकर यांचा शानदार सत्कार करण्यात आला. गौरव सोहळ््यानंतर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, भरत दौंडकर,तुकाराम धांडे आणि प्रा.प्रशांत मोरे यांच्या ‘रंग कवितेचे’ या सुरेख काव्य मैफलीचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. प्रारंभी सावली सामाजिक संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणारी गोविंद पारकर आणि पवित्र श्रीवास्तव यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता गोविंद पारकर, पवित्र श्रीवास्तव, श्वेता कोहोजकर, श्याम माळी, संदेश भोईर, आशिष गडगे, अंकिता देसाई, मंजुळा निरगुडा आदींनी परिश्रम घेतले.