दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील तरु णांनी वन्यजीवांना उपयोगी ठरणाऱ्या शेवग्याच्या रोपांचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी रोपांची लागवड करून तरुणांकडून वृक्षसंवर्धनाची संकल्पना करण्यात आली आहे.
ही वृक्ष लागवड संकल्पपूर्तीसाठी आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी आहेच. मात्र, याचे मुख्य कारण सध्या सर्वत्र रानमाळ उजाड होत चालल्याने रानातील वन्यजीवास मिळणारा रानमेवा नष्ट होत आहे. परिणामी आता ग्रामीण भागात व शहरात वन्यजीवांचा सुळसुळाट दिसत आहे. खाद्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायतीमध्ये वन्य जीवांच्या संख्येत वाढ होऊन विविध फळपिकांची नासाडी झाल्याचे दिसून येत आहे. यावरती उपाय म्हणून व पक्षी व प्राण्यांबाबत आदर व आपुलकी असल्याने वन्यजीवांना शेवग्याच्या झाडांचा पाला व येणारी शेंग या दोन्ही गोष्टी खाद्यासाठी मिळून शेतकºयांना आपले पीक वाचवता येईल असे तरुणांनी सांगितले. याच विचाराने वेळास येथील अनंत अपराध, सुदर्शन शिलकर, सचिन दळवी, गणेश खेडेकर, संजय खेडेकर, दीपक वाजे, स्वराज घोले, नरेश जाधव, विद्येश हाटे, अभय भाटकर, प्रकाश दिवेकर आदी तरुणांकडून ७० रोपांची लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन सुद्धा करण्यासाठी संकल्प करण्यात आहे. वेळास गावाच्या जवळच माळावर वन्यजीवांसाठी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आहे.