शहापूर : किना-यावरील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम दुस-या दिवशीही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 03:44 PM2018-02-09T15:44:16+5:302018-02-09T15:51:10+5:30
शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरीता श्रमदान करण्याकरीता निघाला होता.
जयंत धुळप/शहापूर - शहापूर-धेरंड येथे शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सकाळी प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरीता श्रमदान करण्याकरीता निघाला होता. श्रमदान करण्यासाठी निघालेला हा प्रत्येक जण गुरुवारी केलेल्या दिवसभराच्या श्रमदानाने खरतर पूर्णपणे थकून गेला होता परंतू आपल्याच गावाच्या आणि आपल्याच कुटुंबाच्या बचावासाठी दुस-या दिवशी देखील न थकता श्रमदान करणे अपरिहार्य असल्याने कुणाच्याही कपाळावर तक्रारीची आठी नव्हती.
बंधा-यांची दुरुस्ती केली नाही तर पुन्हा समुद्राचे पाणी थेट गावात समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. परंतु गावांतील सर्व शेतक-यांची जॉबकार्ड तयार नसल्याने, कामास शासकीय मंजुरी मिळण्याची प्रक्रिया झालेली नसल्याने, प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. मात्र येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी सद्यस्थितीत फुटलेल्या संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती (खांडी बुजविणो)केली नाही तर पुन्हा गुरुवारी अमावास्येच्या उधाणाला समुद्राचे पाणी भातशेती पार करुन थेट गावांत आणि घरात घूसण्याची दाट शक्यता असल्याने हे सारे 250 स्त्री-पुरुष शेतकरी ग्रामस्थ गुरुवारपासून श्रमदान करुन फूटलेले संरक्षक बंधारे दगड-चिखलमाती घालून बुजवण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.