खालापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. या रस्त्याचे काम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असून त्यासाठी आंदोलनेही झाली आहेत. मात्र या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने शेकापक्ष आक्र मक झाला असून ११ जुलै रोजी शेकापच्या वतीने अनोखे आंदोलन केले जाणार असून पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मानवी साखळी तयार करून शासनाचा निषेध केला जाणार आहे. माजी आ. विवेक पाटील यांनी खोपोली येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली असून या अनोख्या आंदोलनात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही विवेक पाटील यांनी केले आहे.पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मात्र हे काम अर्धवट असून संथगतीने काम सुरू आहे. मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. सतत गजबजलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले. पेण, अलिबाग, माणगाव, रोहा, सुधागड, मुरूड या तालुक्यातील रूग्णांना मुंबई किंवा पनवेल येथे उपचारासाठी न्यायचे असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वेळेत रूग्णालयात पोहचता येत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले.आघाडी सरकारने सुरू केलेल्या या रस्त्याचे काम सध्याच्या सरकारलाही पूर्ण करता आले नाही हे सरकारचे अपयश असल्याची टीका आ. धैर्यशील पाटील यांनी केली. सरकारचे लक्ष वेधणाररास्ता रोको केल्यानंतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेकापक्षाच्या वतीने ११ जुलै रोजी पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. यावेळी प्रवाशांना थांबवून पाण्याची बाटली व केळी देणार असल्याचेही आ. धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
चौपदरीकरणाचे काम रखडल्याने शेकाप आक्रमक
By admin | Published: July 07, 2016 2:30 AM