रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, पवार यांनी मिश्कील टिपण्णी केली. तसेच याबाबत बोलताना पवारांनी स्वत: काहीही न बोलता, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या खांद्यावर बंदुक ठेवत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. भाजपाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर, पवारांनी हे उत्तर दिले.
मराठा आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकेल का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, मी काही वकिल नाही. त्यामुळे पुढे काय होतं ते पाहायचंय, असे पवार यांनी म्हटलं. मात्र, पुढे बोलताना त्यांनी अमित शहांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. भाजपाध्यक्षांनी तेलंगणात बोलताना परवा एक विधान केलं, 50 टक्क्यांपेक्षा अधिकचं आरक्षण टिकणार नाही, असं शहा म्हणाले होते. त्यामुळे अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका स्विकारावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण टिकणार का, हा प्रश्न शरद पवारांसाठीही अनुत्तरीतच असल्याचे दिसून येते. पण, अमित शहांच्या विधानाचा संदर्भात देत पवार यांनी नेहमीप्रमाणे शब्दांची गुगली टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होतील का, याबाबत असं काहीही माझ्या कानावर आलेलं नाही. मला केंद्र सरकारकडून जी माहिती आहे, त्यानुसार असं काहीही नाही, असे पवार यांनी म्हटले.