पनवेल : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, याची काळजी वाटते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढणार असल्याने अशा परिस्थिती टिकुन राहण्यासाठी युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. (विठोबा खंडाप्पा) विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात कारखानदारी वाढत चालली असल्याने युवा पिढीने गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला आपला पाठिंबा असून फक्त त्या कौशल्य, गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. व्ही. के. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेलमधील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत वेळोवेळो त्यांचे मागदर्शन लाभल्याने विचार जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही. के. विद्यायालचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्ही. के. विद्यालयाला शंभरवर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शतक महोत्सवाचे आयोजन केले. याकरिता विद्यार्थ्यांनी वर्गणी काढली होती. शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी मागील महिनाभरापासून विद्यार्थी तसेच शाळेचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील हे प्रयत्नशील होते.
भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 4:47 AM