अलिबाग : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेऊन सर्वाेच्चपदी विराजमान होणारे नेते आता संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. भाजपाचे लोकसभेतील सदस्य आणि मंत्री घेतलेल्या शपथेशी प्रतारणा करीत आहेत. संविधान बदलण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र सर्वांनी मिळून हाणून पाडणे गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.कोकण विभागातील संविधान बचाव अभियानाची सांगता रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झाली, त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेच्या न्यायाचा हुंकार दिला होता. त्याच पवित्र भूमीत संविधान वाचवण्याचे अभियान राबवण्याची वेळ भाजपा सरकारमुळे आली आहे. देशाची सूत्रे ज्यांच्या हातामध्ये आहेत, त्यांचा संविधानावर विश्वास नाही, तेच आता घटना बदलण्याची भाषा करीत आहेत. हे देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोकादायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून देशातील महिलाशक्तीने एकजुटीने भाजपाचे मनसुबे उधळून लावावेत, असे आवाहन पवार यांनी केले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे, राष्ट्रीय महिला आघाडीच्या प्रमुख फौजिया खान यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी आमदार विद्या चव्हाण, आमदार सुरेश लाड, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विद्या चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे दहन केले.>राम मंदिरासाठी घरे उद्ध्वस्त का करता?राम मंदिराच्या मुद्द्यावर आयोध्येमधील एक शिष्टमंडळ भेटले. त्यांनी सांगितले राम मंदिराचे काम सुरू होणार आहे. मंदिराला आमचा विरोध नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले; परंतु मंदिर परिसरातील सुमारे अर्धा किलोमीटर परिघातील इमारती पाडून तेथे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रामाच्या नावाने मंदिर बांधायचे, त्यासाठी आजूबाजूच्या लोकांची घरे उद्ध्वस्त करून रामाला जसा वनवास भोगाला लागला तसा वनवास तेथील लोकांना भोगावा लावायचा आणि रामाबद्दलचे प्रेम दाखवायचे हे काही योग्य नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
संविधान बदलण्याचे भाजपाचे षड्यंत्र हाणून पाडा- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 5:54 AM