अंतुलेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचे जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:11 AM2018-12-06T00:11:59+5:302018-12-06T00:12:11+5:30
रायगड जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या स्व. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आंबेत गावामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी जंगी स्वागत करण्यात आले.
म्हसळा : रायगड जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या स्व. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आंबेत गावामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी जंगी स्वागत करण्यात आले. शरद पवार यांच्या म्हसळा आगमनाने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या आंबेत हे गाव रायगड जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून समजले जाते.
माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे श्रीवर्धनचे प्रचारक नावीद अंतुले यांच्या राजकरणातील प्रवेशानंतर काँग्रेस पक्षात एक नवचैतन्य झाले. त्यानंतर त्यांनी आंबेत ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यातून घेऊन काँग्रेसला यश मिळवून दिले. या विजयासाठी त्यांनी आघाडीतील राष्ट्रवादीला सोबत न घेता युतीमधील सेनेला सोबत घेतले होते. नावीद अंतुले सध्या श्रीवर्धन मतदार संघामधे काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, यासाठी त्यांना मुस्लीम समाज व अनेक युवकांची मोठ्या प्रमाणात साथ असल्याचे समजते. याचाच धसका आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जंगी स्वागत आंबेत गावामध्ये ठेवले, याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. मात्र, शरद पवार यांच्या म्हसळा तालुका आगमनाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र होते. या प्रसंगी समारंभाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री सुनील तटकरे, स्थानिक स्वराज्य संथेचे आमदार अनिकेत तटकरे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अली कौचाली, मुंबई उपाध्यक्ष भास्कर (दाजी) विचारे, रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
>शरद पवार यांची गोरेगाव येथे धावती भेट
माणगाव : माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी गोरेगाव येथे शिवाजी चौकात आपल्या कार्यकर्त्यांची बुधवारी धावती भेट घेतली. या वेळी गोरेगावमधील शेकडो मुस्लीम महिलांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. शरद पवारांनी पहिल्यांदाच गोरेगावमध्ये भेट दिली. या वेळी ग्रामपंचायत गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी व सर्व सदस्यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच संत रोहिदासनगरमधील ग्रामस्थांनी चित्रकार मंगेश गोरेगावकर यांनी रेखाटलेली खा. शरद पवार यांची प्रतिमा त्यांना भेट दिली. त्यानंतर खा. शरद पवार यांनी ना.म. जोशी विद्याभवन शाळेस धावती भेट दिली. या वेळी खा. शरद पवार यांच्या सोबत माजी मंत्री आ. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर उपस्थित होते.
>राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेला रायगड दौरा हा मतदार संघाची चाचपणीसाठी असून रायगड, रत्नागिरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.