अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील तब्बल ७५८ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईत बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर आणि तत्कालीन तज्ज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या दोघांना पीएमएलए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.पेण अर्बन सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या रकमेचे मनी लाँड्रिंग केल्या प्रकरणी दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. घोटाळ्याचा फटका बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. दरम्यान, याआधी शिशिर धारकर, प्रेमकुमार शर्मा यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.पेण अर्बन सहकारी बँकेत गेल्या आठ वर्षांपूर्वी हा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या घोटाळ्या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षण पथकाने १२८ खाती बोगस असल्याचे अहवालामध्ये नमूद केले होते. यानंतर शिशिर धारकर आणि प्रेमकुमार शर्मा हे या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे.धारकर आणि त्यांच्या कंपूने बँकेच्या ठेवींच्या पैशातून खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी ईडीने जप्त केल्या आहेत. त्या विक्री करून ठेवीदारांना त्यांचे पैसे द्यावे, असा प्रस्ताव ठेवला असता ईडीचे मुंबईतील संचालक ए. एस. सानप यांच्याबरोबर २०१४ मध्ये केलेल्या चर्चेत त्यांनी अशी तरतूद कायद्यात नसल्याचे सांगितले. या सर्व जमिनी केंद्र सरकारकडे जमा केल्या जातील, असे ठेवीदार संघर्ष समितीचे नरेन जाधव सांगितले होते.
पेण अर्बन बँकेतील आरोपी धारकर, शर्मा यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:10 AM