शौर्यदिनी अभिवादन
By admin | Published: March 27, 2017 06:19 AM2017-03-27T06:19:53+5:302017-03-27T06:19:53+5:30
किल्ले रायगडपासून काही अंतरावरच असलेल्या कावळे बावळे खिंडीचा शिवकालीन इतिहास आज पुन्हा एकदा जागृत
महाड : किल्ले रायगडपासून काही अंतरावरच असलेल्या कावळे बावळे खिंडीचा शिवकालीन इतिहास आज पुन्हा एकदा जागृत झाला. निमित्त होते शिवकालीन सरदार गोदाजी जगताप आणि जीवा सर्कले नाईक यांनी २५ मार्च १६८९ रोजी या खिंडीमध्ये गाजविलेल्या शौर्याचे. महाड येथील गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान रायगड यांच्यावतीने शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते. गोदाजीराजे जगताप यांचे वंशज आणि माजी आमदार माणिक जगताप यांनी पूर्वजांमुळेच आपली ओळख आहे. त्यामुळे पूर्वजांचे नाव जपायची शपथ आपण सर्वांनी घ्यावी, असे आवाहन केले.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता शिवभक्तांनी सांदोशी येथून कावळे बावळे खिंडीकडे प्रयाण केले. या खिंडीमध्ये पूजन केल्यानंतर, पुन्हा सर्व शिवभक्त सांदोशी येथे आले. या ठिकाणी वीरगळींचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रा. सचिन जोशी, सांदोशी येथील ग्रामस्थ, जीवा सर्कले नाईक यांचे वंशज उपस्थित होते.