पाहुणी म्हणून आली अन् डल्ला मारून गेली; मेहुण्याच्या मुलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:09 AM2019-01-03T00:09:23+5:302019-01-03T00:18:24+5:30
कर्जतमध्ये राहणाऱ्या एका इसमाच्या मेहुण्याची मुलगी घरी पाहुणी म्हणून आली. चार दिवस पाहुणचार घेऊन घरी जाताना सर्व झोपल्याचे पाहून एक लाख १५ हजार ९१० रुपयांचा डल्ला तिने मारला.
कर्जत : कर्जतमध्ये राहणाऱ्या एका इसमाच्या मेहुण्याची मुलगी घरी पाहुणी म्हणून आली. चार दिवस पाहुणचार घेऊन घरी जाताना सर्व झोपल्याचे पाहून एक लाख १५ हजार ९१० रुपयांचा डल्ला तिने मारला. तिला २४ तासांच्या आत पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले.
कर्जत नगरपरिषद हद्दीत गुंडगे येथे राहत असलेले राजेंद्र तोमर हे कर्जत स्टेशनवर वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मेहुण्याची मुलगी शिल्पी राठोड ही २५ डिसेंबर रोजी इंदोरवरून कर्जतमध्ये आपल्या आजीला भेटण्यासाठी आली. ती त्यांच्याकडे चार दिवस राहिली. २९ डिसेंबर रोजी सर्व जण गाढ झोपलेले आहेत हे बघून शिल्पीने कोणाला सांगता घर सोडले. जाताना तिने हात साफ केला.
वडापावचा धंदा करून नवीन घर घेण्यासाठी तोमर व त्याच्या पत्नीने पैसे जमा करून ठेवले होते. मात्र, शिल्पीने त्यांच्या घरातील एक लाख रुपयांची रोख रक्कम तसेच दरवाजाला अडकवलेल्या पॅण्टच्या खिशातील पाच हजार ९१० रुपये आणि सात हजार रुपये किमतीचा मोबाइल घेऊन पळ काढला.
शिल्पी कोणालाच न सांगता अचानक निघून गेल्याने या प्रकरणी घरच्यांनी तिच्यावर संशय व्यक्त केला. या बाबत राजेंद्र सिंग तोमर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे आणि पोलीस कर्मचारी भूषण चौधरी पुढील तपास करीत होते. तिने चोरून नेलेल्या मोबाइलवरून पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले आणि कर्जतमधून पळून गेलेली शिल्पी परत इंदोर कडे जाताना पोलिसांनी तिला पनवेल रेल्वेस्थानकावर पकडले.
तिच्याकडे चोरून नेलेला मोबाइल आणि थोडी रक्कम सापडली. तिच्याकडे अधिक चौकशी करता तिने एक लाख रुपयांची रोकड तोमर राहतात, त्याच इमारतीच्या खाली एका बॅगमध्ये लपवली असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्या ठिकाणी झडती घेतली असता रोकड सापडली. शिल्पीने पळवलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळविले.