आविष्कार देसाई अलिबाग : एक महिला म्हणून महिलांसाठी काही तरी करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी निर्णय घेत सरकारी नोकरीला ठोकर मारत ‘पल्लवी स्वयंसहायता उद्योगा’च्या माध्यमातून तब्बल ३० महिलांच्या हाताला स्वाभिमानाचे काम दिले. सर्व महिलांच्या हिमतीच्या बळावरच शिलाई उद्योगाच्या माध्यमातून भरारी घेत महिन्याला प्रत्येक महिलेच्या हातात किमान सहा हजार रुपये पडत आहेत.
अलिबाग तालुक्यातील सुप्रिया नाईक यांनी रायगड जिल्हा परिषदेमध्ये तब्बल २५ वर्षे कारकुनी केली. त्यांचे पतीही याच ठिकाणी कामाला होते. पदरामध्ये तीन मुली असल्याने आई म्हणून त्यांचे भविष्य घडवण्यासाठी नोकरी करत होत्या. मात्र त्यांच्यातील एक महिला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महिलांसाठी काही तरी करण्याची त्यांची धडपड सुरूच होती. नोकरीच्या जंजाळामुळे मनासारख्या कामाला वेळ देता येत नसल्याने अखेर सुप्रिया यांनी सरकारी नोकरीला ठोकर मारत व्हीआरएस घेतली आणि एक मोकळा श्वास घेतला.उमेदीच्या कालावधीत त्यांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीला कपडे शिवण्याची छोटी-मोठी कामे मिळत होती. त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. कालांतराने हळूहळू जिद्दीच्या जोरावर शाळा, महाविद्यालय, सरकारी रुग्णालये येथील गणवेश शिवण्याचे टेंडर मिळत गेले. त्यामुळे आता कामाची कमतरता त्यांना भासत नाही.
परिश्रम, जिद्द बाळगल्यास कोणतेही काम शक्यएक महिलाच महिलांचे दु:ख जाणू शकते. नोकरी करताना गरजू महिलांसाठी काही तरी करावे असे वाटत होते. महिलांनी त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे. कठोर परिश्रम आणि जिद्द उराशी बाळगली तर जगातील कोणतेही काम महिलांच्या आवाक्याबाहेर नाही. महिलांनी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिकले पाहिजे, असे नाईक आवर्जून सांगतात.