भाजी विकायला गेली म्हणून वाचली; पण मुलगा, पतीसह संसार ढिगाऱ्याखाली गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:32 AM2023-07-21T08:32:08+5:302023-07-21T08:32:49+5:30
...पण पती, मुलगा गमावून बसली
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : नेहमीप्रमाणे शेतात पिकलेली भाजी काढून ती पनवेल बाजारात विक्रीस गेली. घरी नवरा, मुलगा. मात्र, गुरुवार हा तिच्या कुटुंबासाठी काळ ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही तिच्या मनात नव्हती. भाजी विकण्यास गेल्याने ती दरड दुर्घटनेत वाचली. मात्र, तिचा पती आणि मुलगा दरड दुर्घटनेत गाडले गेले. तारी पारधी हिची ही दुःखद कहाणी आहे. इर्शाळवाडी आदिवासी दरड दुर्घटनेत नवरा पांडू पारधी, मुलगा अबोस पारधी हे मरण पावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तारी ही आपला पती आणि मुलासोबत पन्नास वर्षांपासून वाडीत वास्तव्य करीत आहे. घरच्या शेतीवर पारधी कुटुंबाची गुजराण सुरू होती. शेतात पिकवलेली भाजी घेऊन डोंगर उतरून रोज पाच-सहा किलोमीटर चालत मुख्य रस्त्यावर येऊन पनवेलला विकायला जात होती. बुधवारीही तारी नेहमीप्रमाणे भाजी विकण्यास पनवेल येथे गेली होती. तर पती आणि मुलगा हे घरीच होते. बुधवारी तारी ही पनवेलला आपल्या नातेवाईकांकडे राहिली. परंतु, इकडे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडीवर डोंगरातील मातीचा ढिगारा कोसळून उभारलेला तारीचा संसार गाडला गेला.
सकाळी दुर्घटनेबाबत कळल्यावर तातडीने ती गावात आली. मातीचा ढिगारा पाहून तिने हंबरडा फोडला. मेहनतीने उभा केलेला संसार एका झटक्यात उद्ध्वस्त झाला. आता उरला तो मातीचा ढिगारा आणि कुटुंबाच्या आठवणी.