कर्जत : कर्जतमधून मेंढ्या, बोकड, बकरी असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी चोरून नेला होता, त्या चोरट्यांना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. (Sheep, goats, goat thieves arrested in Karjat, thieves arrested in 15 days)१४ मार्च रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास कर्जत भिसे गाव येथील जुने एसटी स्टॅन्ड येथे राहणारे दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यातून ११ मेंढ्या, बोकड, बकरी असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला होता, त्याबाबत दीपक धनगर यांनी कर्जत पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार केली होती. गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे आणि पोलीस अंमलदार भूषण चौधरी करीत होते.गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच शेडुंग फाटा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता गुन्हा करताना आरोपींनी फोर्ड कंपनीच्या आयकॉन मॉडेलचे वाहन क्रमांक ८५५२ चा वापर केला असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. अर्धवट मिळालेल्या क्रमांकावरून पोलिसांनी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर पुणे यांची मदत घेऊन तसेच कौशल्य वापरून या वाहनापर्यंत पोहोचून गुन्ह्यातील आरोपी सुंदरेश वरण गणेश मुदलियार ऊर्फ अण्णा (राहणार सुभाष टेकडी उल्हासनगर),व अकील मोहम्मद अजिद कुरेशी (राहणार कौसा, मुंब्रा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले.या आरोपींकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी धुळे, नाशिक येथेसुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात कबूल केले असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास लावला.
कर्जतमध्ये मेंढ्या, बोकड, बकरी चोरणारे अटकेत, पंधरा दिवसांत लावला चोरट्यांचा छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 1:48 AM