पेणमध्ये ४००० हेक्टर भातपिकाची धूळधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:00 AM2018-10-21T03:00:41+5:302018-10-21T03:00:46+5:30
चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली.
पेण : चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह आलेल्या परतीच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे कापलेली भाताची कडपे लोंब्यांसह पाण्यात भिजल्याने भाताचा दाणा फुगून त्याला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवारीही पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
तालुका कृषी विभागाने तातडीने शेताच्या बांधावर धाव घेत बाधित शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत. पेण तालुक्यातील एकूण भात लागवड केलेल्या १२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रांपैकी ४० टक्के क्षेत्र अंदाजे ४००० हेक्टरवरील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, आतापर्यंत २२५० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांनी स्पष्ट केले.
यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पीकही चांगले आले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी केली. गेले दोन दिवस सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
तहसील कार्यालयाने शेती नुकसानाच्या पंचनाम्याच्या सूचना केल्यावर, तालुका कृषी अधिकाºयांनी तातडीने कामास सुरुवात केली आहे.
>शेतकरी आर्थिक संकटात
पेणच्या एकूण लागवड झालेल्या १२ हजार ४०० हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रात खारेपाटातील शेती समाविष्ट आहे. यापूर्वी झालेली चक्रिवादळात उभे पीक भुईसपाट झाले होते. त्यावर आता दोन दिवस वादळी पावसाने कापणी केलेली शेती, उडवी व कापायची राहिलेली शेती असे अंदाजे ४००० हेक्टर क्षेत्रावर परतीच्या पावसाने कहर माजवला आहे. या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील नुकसानाचा आकडा मोठा असून, पंचनामे थेट शेताच्या बांधावर जाऊन कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून शासकीय कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत.