कृषी, कामगार कायद्याच्या विरोधात शेकापचे रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:25 PM2020-11-19T23:25:26+5:302020-11-19T23:26:13+5:30
२६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी केला आहे. केंद्र सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी २६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली. याच दिवशी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. त्यांचा हा डाव कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही. या कायद्यातील तरतुदी अतिशय भयानक आहेत. सिलिंग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला जाणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्यात येणार आहेत. याला देशभरातून कडाडून विराेध होणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निसर्ग चक्रिवादळात झालेले नुकसान अजूनही भरून देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापि मदतीपासून वंचितच आहेत. झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी छोट्या-मोठ्या उद्योगांना सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. या कालावधीत आलेले भरमसाट वीजबिल पूर्णपणे माफ केलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनाही पुरेशी नुकसानभरपाई दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योग्य पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात आरोग्य सेवा योग्य नसल्याने अनेकांचे जीव जात असल्याने ही सेवा सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रोहा तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदीबाबतही जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत स्थानिक भुमिपूत्रांना उध्वस्त करणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात शेकापक्ष ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावांत बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, औरंगाबादचे जिल्हा चिटणीस काका शिंदे, जिल्हा परिषदेेच्या अर्थ व बांधकाम सभापती अॅड. नीलिमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, माजी सभापती प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, अॅड. प्रसाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.