सुनियोजित पाणीपुरवठ्याचा भेकरेवाडी पॅटर्न अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:31 PM2019-03-11T23:31:48+5:302019-03-11T23:32:18+5:30

झऱ्याच्या आधारे चोवीस तास पुरवठा; स्थानिकांनी स्वखर्चातून टाकली जलवाहिनी

Shekrekwadi Pattern tops for well planned water | सुनियोजित पाणीपुरवठ्याचा भेकरेवाडी पॅटर्न अव्वल

सुनियोजित पाणीपुरवठ्याचा भेकरेवाडी पॅटर्न अव्वल

Next

- वैभव गायकर

पनवेल : उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागते. धरणे, विहिरी आदी ठिकाणच्या पाण्याची पातळी खालावल्याने हे परिणाम दिसू लागतात. अशा वेळी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते. मात्र पनवेल तालुक्यातील भेकरेवाडी आदिवासी पाडा या सर्व गोष्टींना अपवाद आहे. ग्रामस्थांनी सुमारे चार किलोमीटर लांबून नैसर्गिक झऱ्यातून नळपाणी योजना सुरू केली आहे.

मागील चार वर्षात आदिवासी पाड्यात एकदाही पाणीटंचाई जाणवली नाही. पनवेल तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीत डोंगर कपारीत भेकरवाडी हा आदिवासी पाडा वसला आहे. पाड्यात पाणीपुरवठ्याचे कोणतेच साधन नसल्याने येथील रहिवासी बाबू निरगुडा, संतोष हवाली, भालचंद्र हवाली या तिघांनी प्रत्येकी ५ हजार रु पये काढून पाड्यापासून चार किमी अंतरावर असलेल्या राजप्रधान परिसरातील नैसर्गिक झºयातून पाणी आणण्याचे नियोजन केले. नैसर्गिक झºयात बंदिस्त टाकी बांधून त्याठिकाणी जलवाहिनी जोडली आहे. हा झरा उंचावर असल्याने जोडलेल्या जलवाहिनीद्वारे थेट पाड्यात मधोमध तीन सिंटेक्सच्या टाकीमध्ये पाणी साठवले जाते. एकूण १२ हजार लीटरच्या तीन टाक्यांद्वारे संपूर्ण पाड्याला चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. याकरिता पाच ठिकाणी सार्वजनिक नळ (स्टॅन्ड पोस्ट) उभारले आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रि येत इलेक्ट्रिक उपकरणाचा उपयोग न करता यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
भेकरेवाडी आदिवासी वाडीत एकूण ४२ घरे आहेत. २५0 ते ३00 च्या आसपास येथील लोकवस्ती आहे. अनेकांनी येथील पाणी आपल्या घरापर्यंत घेऊन गेले आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी काही नियम निश्चित केले आहेत.

पाण्याची टाकी साफ करायची जबाबदारी देखील ग्रामस्थांनी आपापसात वाटून घेतली आहे. प्रत्येक १५ दिवसांनी टाकी स्वच्छ केली जाते. वाडीला चोवीस तास पाणीपुरवठा मिळत असल्याने महिलावर्गामध्ये आनंद आहे. यापूर्वी डोंगर कपारीत पाण्यासाठी फिरावे लागत असे.उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट आहे. अशा परिस्थितीत घरांपर्यंत चोवीस तास पाणी मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सीताबाई पांडुरंग पारधी सांगतात.

भेकरेवाडीतील पाण्याची भीषण परिस्थिती पाहता, आम्ही झºयाचे पाणी उपयोगात आणण्याचे नियोजन केले. झºयाच्या ठिकाणी टाकी बांधून त्याठिकाणी प्लॅस्टिकची जलवाहिनी जोडली. झरा उंचीवर असल्याने पाणी उच्चदाबाने जलवाहिनीद्वारे वाहू लागले आणि पाड्याचा पाणीप्रश्न सुटला.
- बाबू निरगुडा, ग्रामस्थ, भेकरेवाडी

खारघरसारख्या मेट्रोसिटीतही अनेकदा पाण्याची समस्या भेडसावते. येथील धामोळे आदिवासी पाड्यात अद्याप टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेषत: येथील पांडवकडा धबधबा राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र या धबधब्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावात अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. भेकरेवाडीसारखी यंत्रणा याठिकाणी देखील राबविण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Shekrekwadi Pattern tops for well planned water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी