मेंढपाळ निघाले परतीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:35 AM2018-05-26T03:35:29+5:302018-05-26T03:35:29+5:30
दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून आपले राहते घर सोडून, आपल्या कुुटुंबासह शेळ्यामेंढ्या, घोडे, कोंबड्या असा संसार घेवून कोकणात येण्याच्या वाटेला लागतो.
कार्लेखिंड : मेंढपाळ बांधव कोकण भागातून आपल्या गावाकडे परतीच्या वाटेला लागले. कोकण भागात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होत असते. त्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील धनगर समाजाचे मेंढपाळ दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आपल्या गावी जाण्यासाठी निघतात.
दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून आपले राहते घर सोडून, आपल्या कुुटुंबासह शेळ्यामेंढ्या, घोडे, कोंबड्या असा संसार घेवून कोकणात येण्याच्या वाटेला लागतो. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील धनगर बांधव खोपोली, पेण, अलिबाग या तीन तालुक्यातून आपल्या जनावरांना चारत चारत नऊ महिने कोकणात काढतात. उन्हातान्हातून काट्याकुट्यातून मिळेल त्या ठिकाणी आपले पाल टाकून दुसऱ्या दिवशी दुसºया गावाला जाण्यासाठी तयार असतात. धनगर बंधू हे स्वत:च्या किंवा दुसºयाच्या मालकीच्या शेळ्यामेंढ्या घेवून येत असतात आणि त्यातूनच आपले उत्पन्न मिळवितात. स्वत:च्या गावी पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी आपले गाव सोडत असतात.
गेली ५० वर्षे अलिबाग तालुक्यात दरवर्षी येणारे सखाराम कोकरे हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहेत. ते म्हणतात, आमच्या गावी सतत दुष्काळ असल्याने राहते घर सोडून अशाच पद्धतीने आम्हाला व्यवसाय करावा लागतो. मुलांना धड शाळा शिकता येत नाही. जरी शिकले तरी नोकरी मिळत नाही. मग नाईलाजाने परंपरागत व्यवसाय करावा लागतो. खिशात पैसे असले तरी कोणत्याही प्रकारची सुविधा उपभोगता येत नाही. आयुष्य असेच शेळ्यामेंढ्या पाळत काट्याकुट्यातून ढकलावे लागते.