निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (२९ मार्च) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत्या. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. एक अभ्यासू महिला नेता अशी त्यांची ख्याती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून मीनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या एक झुंजार नेत्या अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!" असे ट्विट पवारांनी केले.