शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 07:08 AM2024-10-23T07:08:49+5:302024-10-23T07:09:35+5:30
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार पारंपरिक जागा शेकापला मिळाव्यात, यासाठी पक्ष सुरुवातीपासूनच आग्रही
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शेकापने रायगड चार, सोलापूरमधील सांगोला आणि नांदेडमधील लोहा-कंधार या सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार मंगळवारी जाहीर केले. चित्रलेखा पाटील (अलिबाग), अतुल म्हात्रे (पेण), बाळाराम पाटील (पनवेल), प्रीतम म्हात्रे (उरण) आणि बाबासाहेब देशमुख (सांगोला), श्यामसुंदर शिंदे (लोहा-कंधार) हे शेकापचे उमेदवार आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार पारंपरिक जागा शेकापला मिळाव्यात, यासाठी पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शक्तिप्रदर्शन करून पाटील यांनी उमेदवारी जाहीर करून रणशिंग फुंकले आहे.
- पारंपरिक मतदारसंघात पुन्हा लालबावटा फडकविणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला. तसेच शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीसोबत आहे, असेही स्पष्ट केले.
- शेकापने अलिबागमधून दिवंगत मिनाक्षी पाटील यांच्यानंतर चित्रलेखा पाटील यांच्या रूपाने दुसऱ्या महिला उमेदवाराला संधी दिली आहे.
- विधानसभा उमेदवारी जाहीर करण्यासाठी शेतकरी भवन येथे मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयंत पाटील शेकापचे उमेदवार जाहीर करणार हे निश्चित होते. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
- माजी आमदार पंडित पाटील आणि नेते ॲड आस्वाद पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा होती.
आम्ही महाविकास आघाडीत असून, आम्ही दिलेला शब्द बदलत नाही. जिल्ह्यातील पारंपरिक मतदारसंघात आमचे पूर्वीपासून प्राबल्य असल्याने या जागा आम्हाला मिळायला हव्यात, याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणी झाली असून, त्यांनी शब्द दिला आहे. काही जागांवर वाद असला तरी तोडगा निघेल.
- जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप