- जयंत धुळपअलिबाग : गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात आयोजित १३ व्या अविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात पाली येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रा. अंजली सुधीर पुराणिक यांनी सादर केलेला ‘ए ग्रीन अॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा संशोधन प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे. याशिवाय आठ सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह मुंबई विद्यापीठाच्या महोत्सवातही प्रकल्पाने बाजी मारली आहे.औद्योगिक प्रदूषणामध्ये धूलिकण, हरितवायू, आम्ल गुणधर्म असलेले वायू यांचा समावेश होतो. बहुतेक सर्व कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूंमधून धूलिकण बाजूला केले जातात; परंतू हरितवायू व आम्ल वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जातात, यामुळे वैश्विक तापमानवाढीला हातभार लागतो. हे घातक वायू त्यांच्या उगमस्थानीच थांबविण्यासाठी पुराणिक यांनी ‘ए ग्रीन अॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. यामध्ये एक नावीन्यपूर्ण मिश्रण तयार करण्यात आले असून, शोषण (अॅडसॉर्पश) प्रक्रियेच्या मदतीने वायुप्रदूषण थांबविण्यात प्रकल्प यशस्वी झाला असल्याची माहिती प्रा. अंजली पुराणिक यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, संशोधनाची आवड निर्माण करणे, भविष्याला पूरक ठरू शकणारे संशोधन करणाºया विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रोत्साहित करणे, २००७-०८ मध्ये महाराष्टÑाचे तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या संकल्पनेतून ‘अविष्कार’ हा संशोधन महोत्सव सुरू करण्यात आला. संशोधनात गुरू के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या डॉ. भानू रामन यांचे मार्गदर्शन, मुंबई विद्यापीठाच्या अविष्कारचे विशेष कार्य अधिकारी डॉ. एस. एम. बर्वे, डॉ. एम. एन. मोमिन व डॉ. मीनाक्षी गुरव यांचे मार्गदर्शन, प्राचार्य युवराज महाजन व वसंत ओसवाल यांचे प्रोत्साहन लाभल्याचे पुराणिक यांनी सांगितले.>२० विद्यापीठांतील ५८० स्पर्धक सहभागीमहोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय व औषध निर्माण या दहा शाखांमधून विद्यापीठीय शिक्षणातील विविध पातळीवरील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होत असतात. प्रत्येक विद्यापीठाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४८ जणांचा संघ सहभागी होतो. प्रत्येक शाखांतील चार वेगवेगळ्या गटांमधून प्रथम येणाºया दोन स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व रोख पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठातील, ५८० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी १४१ विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रकल्प सादर केले, तर ४३९ स्पर्धकांनी पोस्टर्स सादर केले.
मुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:55 AM