नागोठणे : आर्थिक वर्ष २०१७-१८ ची घरपट्टी गतवर्षी घेतली असतानाही २०१८-१९ ची वसुली करताना गतवर्षीची घरपट्टी पुन्हा वसूल करण्याचा प्रकार शिहू ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे. असा प्रकार अनेक आदिवासी बांधवांच्या बाबतीत घडला असल्याने शासनाने त्याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भास्कर म्हात्रे यांनी केली आहे.
पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीत बोरावाडी नामक वाडी आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या वसुली कारकुनांनी या वाडीवर जाऊन २०१८-१९ या वर्षाच्या घरपट्टीची वसुली केली होती. मात्र, २०१७-१८ या वर्षाची घरपट्टी भरली असतानाही थकबाकी असल्याचे कारण देऊन काही आदिवासी बांधवांकडून सलग दोन वर्षांची वसुली करण्याचा प्रकार घडला होता. आदिवासी बांधवांनी घरपट्टी भरल्या असल्याच्या पावत्या दाखविल्या, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला, असे वसंत मोकल यांनी सांगितले.
आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात घरपट्टीची नोंद करणारी एक छापील नोंदवही आहे. घरपट्टीची पावती फाडल्यानंतर ग्रामसेवकांकडून या वहीत संगणकीय नोंद केली जाते. गतवर्षीच्या आर्थिक वर्षात वसूल झालेल्या घरपट्टीची नोंद या वहीत केली जाते, ज्यांच्याकडून घरपट्टी वसूल झाली नसेल तर तशी नोंदसुद्धा त्यात केली जाते. २०१८-१९ च्या घरपट्टी वसुलीसाठी बोरावाडी येथे गेलो होतो, घरपट्टीच्या नोंदवहीत काही जणांची घरपट्टी येणे असल्याचे निदर्शनास आल्याने तशी वसुली केली आहे.- अनंत पाटील, लिपिक, शिहू ग्रामपंचायतनजरचुकीने अशा नोंदी करावयाच्या राहिल्या असल्यानेच काही जणांकडून पुन्हा एकदा घरपट्टी घेण्यात आली आहे. ज्यांनी गतवर्षी घरपट्टी भरलेली असतानाही यावर्षी जर पुन्हा ती घेतली असेल, तर संबंधितांना घेतलेली रक्कम देण्यास आम्ही बांधील आहोत.- मनोज दहिवलकर, ग्रामसेवक