पोलादपूरमधील शिलाहारकालीन शिवमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:00 AM2021-03-11T00:00:46+5:302021-03-11T00:00:53+5:30
कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : तालुक्यातील देवळे गावाशेजारून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पैलतीरावर शिलाहारकालीन शिवमंदिर असून महाबळेश्वरमधून पश्चिमवाहिनी असणाऱ्या सावित्री नदीवरील हे स्वयंभू स्थान शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाबळेश्वर येथील मंदिरानंतर रायगड जिल्ह्यातील सावित्री तीरावरील हे प्रथम शिवस्थान आहे. त्यामुळे शिवकाळापासून या स्थानाला अधिक महत्त्व आहे. देवळे, पोलादपूर, लोहारे, संवाद, महाड वीरेश्वर मंदिर तसेच शेवटचे हरेश्वर मंदिर ही या शृंखलेतील महत्त्वाची मंदिरे आहेत. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
देवळे येथील मंदिर हेमाडपंती बांधकाम आहे. महाशिवरात्री व श्रावणी सोमवारनिमित देवळे विभागातील बडोदे, मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमानी मंडळींसह वर्षभरात असंख्य शिवभक्त या मंदिराला भेट देतात. लोहारे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. येथेही मोठ्या प्रमाणात वीरगळ सापडले असून येथील वीरगळ रत्नागिरी येथील थिबा पॅलेस येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. श्रीक्षेत्र महालगुर येथे मल्लिकार्जुन शिवमंदिर आहे. हे मंदिरसुद्धा पुरातन असून या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य उंच ठिकाणी जंगल, २०० फूट उंच कडा असलेल्या पूर्व पठारावर हे स्थान आहे. मंदिराच्या शिवलिंगाखालून दक्षिणवाहिनी तीर्थ असून या तीर्थास बिंदुतीर्थ ऐसे म्हणतात. तीर्थातील पाणी भक्तिभावाने प्राशन केल्यास रोगराई व व्याधीपासून मनुष्यमात्र मुक्त होतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या पश्चिमेस पारिजातकाच्या वृक्षाखाली नवनाथांचे वास्तव्य आढळते. येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. तसेच देवपूर येथे कोडजाई मंदिरात शिवलिंग असून तेथे दरवर्षी यात्रा भरते. शिवकाळातील किल्ले चंद्रगड येथे महाशिवरात्रीनिमित्त गडावर असणाऱ्या ढवळेश्वर मंदिरात ग्रामस्थांकडून अभिषेक केला जातो. मोरसडे येथील आडाचा कोंड येथे काही वर्षांपूर्वी स्वयंभू शिवलिंग मिळाले असून येथील महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम केले जातात. महादेवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणारे हे शिवमंदिर चरई गावच्या माथ्यावर असणाऱ्या स्वयंभू शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महापूजा करण्यात येते.
महादेवाचा मुरा येथे शिवमंदिर असून हे शिवमंदिर शिखर शिंगणापूर रायरेश्वर, या शृंखलेतील शेवटचे शिवमंदिर असल्याची माहिती महादेवाचा मुरा येथील पुजारी देतात. येथे गुप्तगंगा असल्याची माहिती पुजारी देतात, दर तीन वर्षांनी येथे गंगेचे आगमन होत असल्याची माहिती कामथे येथील कीर्तनकार नामदेव गायकवाड यांनी दिली. मात्र, सध्या काही वर्षांत येथे गंगेचे आगमन होत नाही, अशी माहिती दिली.
मल्लिकार्जुन मंदिराला आठशे वर्षांचा इतिहास
माणगाव : मल्लिकार्जुन मंदिराला आठशे वर्षांचा इतिहास असून डोंगरावर स्थित एक जागृत देवस्थान आहे. याच्या शंकू शाळुंकी मधून काढता येतो . शाळुंकीच्या आत पोकळ जागा स्वयंभू एकसंघ दगडामध्ये आहे. शंकू काढल्यावर झालेल्या पोकळी मधून कसा बसा एक हात आतमध्ये जातो. आतमध्ये ११ शंकराची पिंड दगडा मधून वर आलेली असून एका पिंडीची जागा रिकामी आहे. या पोकळीमधून पाणी ओतले किंवा वरच्या पिंडीवर अभिषेक केला तरी त्याचे पाणी कुठे जाते हे कळत नाही. या डोंगराच्या पायथ्याला शंकराचे श्री देव वरदेश्वर मंदिर आहे. या मंदिराबाबत अशी आख्ययिका आहे की, मल्लिकार्जुनाचे निस्सीम भक्त विनायक उपाध्ये मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसत. वय झाल्यावर शारीरिक थकव्यामुळे त्यांना मल्लिकार्जुन डोंगर चढता आला नाही. त्यामुळे घराजवळच्या सिद्धी विनायक मंदिराजवळून त्यांनी देव मल्लिकार्जुनाला नमस्कार केला आणि सांगितले की, देवा आता काही माझ्याच्याने दर्शन होणार नाही त्यामुळे शेवटचा नमस्कार समजा. त्या रात्री मल्लिकार्जुन त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले की, तुझ्या घराजवळ मी आलोय जिथे खोदकाम सुरू आहे तिथे खोल जा. त्याठिकाणी खोदल्यावर तीन शंकू पिंडीच्या आकारामधले वर आले. भोवती पाणी होते.