शिळफाटा परिसरात बत्ती गुल!
By admin | Published: December 11, 2015 01:23 AM2015-12-11T01:23:27+5:302015-12-11T01:23:27+5:30
शिळफाटा परिसरातील वीजपुरवठा मंगळवारी १२ तासाहून अधिक वेळ बंद असल्याने परिसरातील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
खोपोली : शिळफाटा परिसरातील वीजपुरवठा मंगळवारी १२ तासाहून अधिक वेळ बंद असल्याने परिसरातील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संतापलेल्या व्यावसायिकांनी बुधवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शिळफाटा परिसरातील फिडरवरील जुने कंडक्टर बदलण्याचे काम वीज वितरण कंपनीने हाती घेतल्याने मंगळवारी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पहाटे ५ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा १२ तासाहून अधिक काळ बंद असल्याने शिळफाटा परिसरातील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच नागरिकांची कामे खोळंबली, यामुळे शिळफाटा परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. या संतापाचा उद्रेक बुधवारी झाला. खालापूर येथे झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींसह व्यापाऱ्यांनी कार्यकारी अभियंता विजय फुंडे यांना धारेवर धरले. यावेळी नगरसेवक कमाल पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, कय्युम पाटील, राजेंद्र फक्के आदी उपस्थित होते. (वार्ताहर)