अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

By राजेश भोस्तेकर | Published: December 20, 2022 05:22 PM2022-12-20T17:22:04+5:302022-12-20T17:23:44+5:30

शेकापकडे तीन तर ठाकरे गटाला एक

shinde group dominates in alibaug murud constituency 7 out of 11 gram panchayats belong to the shinde group | अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग :अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. शिंदे गटाचे अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपला करिष्मा निवडणुकीत विरोधकांना दाखविला आहे. ११ पैकी ७ ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भगवा फडकवला आहे. ठाकरे गटाने कोर्लई ग्रामपंचायत राखण्यात यश मिळविले आहे. शेकापने मतदार संघात तीन ग्रामपंचायतीवर लाल बावटा फडकवला असला तरी काँग्रेस आणि ठाकरे गटाची साथ त्यांना मिळाली आहे. मतदार संघात शिंदे गटच वरचढ ठरला आहे. 

अलिबाग तालुक्यातील आक्षी, वैजाळी, शिरवली, नारंगी, बोरिस गुंजिस, मुळे या सहा तर मुरुड तालुक्यात वेळास्ते, वावडूगी, काकळघर, तेलवडे आणि कोर्लई या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती. १८ डिसेंबर रोजी ११ ग्रामपंचायती साठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदान पूर्वीच शिंदे गटाने मुरुड तालुक्यातील तेलवडे ग्रामपंचायत बिनविरोध खेचून आणून विजयश्रीचा नारळ फोडला होता. 

ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे, ठाकरे गट, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांनी आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे यासाठी मोर्चे बांधणी केली होती. मात्र मतदारांनी शिंदे गटाला कौल दिला आहे. शिंदे गटाने अलिबाग तालुक्यातील बोरिस गूंजीस, नारंगी, शिरवली तर मुरुड तालुक्यातील वेळास्ते, वावडूगी, काकळघर, तेलवडे या ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. ठाकरे गटाचे प्रशांत मिसाळ कोर्लई ग्रामपंचायत राखण्यात यशस्वी झाले आहेत. शेकापला मुळे, आक्षी आणि वैजाळी ह्या ग्रामपंचायत राखण्यात यश आले आहे. शिंदे गटाने मात्र अलिबाग मधील नारंगी, शिरवली या शेकाप कडून तर बोरिस गुंजीस काँग्रेस कडून खेचून आणल्या आहेत. 

काँग्रेसला फटका

अलिबाग तालुक्यात वर्चस्व असलेला काँग्रेस पक्ष हा काही वर्षांपासून मतदारापासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आताच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर अलिबाग, मुरुड मतदार संघात काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. गेली पंधरा वर्ष सत्ता असलेली बोरिस गुंजीस ग्रामपंचायत ही काँग्रेसच्या हातातून निसटली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रणनीती आखणे गरजेचे झाले आहे. 

भाजपलाही खाते उघडता आले नाही

अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात भाजपनेही आपले उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले होते. अलिबागमध्ये शिरवली ग्रामपंचायत मध्ये भाजपने सरपंच उमेदवार उभा केला होता. मात्र त्याठिकाणी शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपला अलिबाग मध्ये एकही खाते उघडता आलेले नाही आहे.

मुरुड विजयी सरपंच

काकळघर : सरपंच स्वस्तिक ठाकूर ( शिंदे गट)

वावडूगी : ऋतुजा वलणकर  ( शिंदे गट)

वेळास्ते : क्षणीता खेडेकर  ( शिंदे गट)

तेलवडे : कल्पना अंकुश पवार  ( शिंदे गट)

कोर्लई :  प्रशांत मिसाळ (ठाकरे गट )

अलिबाग विजयी सरपंच

आक्षी : रश्मी रवींद्र पाटील (शेकाप)
वैजाळी : शैला रवींद्र पाटील (शेकाप)

मुळे : सुहानी संतोष पाटील (शेकाप)

नारंगी : उदय म्हात्रे (शिंदे गट)

बोरिस गुंजीस : सदिच्छा सुधीर पाटील (शिंदे गट)

शिरवली : प्रनिकेत म्हात्रे (शिंदे गट)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shinde group dominates in alibaug murud constituency 7 out of 11 gram panchayats belong to the shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.