"ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:26 PM2024-09-11T18:26:37+5:302024-09-11T18:39:01+5:30

नेरळमधील मारहाणीच्या घटनेवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Shinde group MLA Mahendra Thorve explanation on the beating incident in Neral | "ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

"ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

MLA Mahendra Thorve : नेरळ येथे एका व्यक्तीकडून गाडीमध्ये चालकाच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला मारहाण होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाकरे गटाने हा व्हिडीओ पोस्ट करत मारहाण करत असलेली व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षारक्षक असल्याचा दावा केला आहे. राज्यभरात गुंडगिरी वाढलीये म्हणत ठाकरे गटाने सरकारला लक्ष्य केलं आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

ठाकरे गटाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक तरुण चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीला अतिशय अमानुषपणे मारहाण करत आहे. मारहाण होत असलेल्या व्यक्तीची लहान मुलं, पत्नी मारु नका अशा याचना करत होत्या. मात्र हल्लेखोराने कोणाचेच ऐकलं नाही आणि मारहाण सुरु ठेवली. मारहाण करणारी व्यक्ती आमदारा महेंद्र थोरवे यांचा सुरक्षारक्षक शिवा असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.  आता या सगळ्या प्रकरणावर आमदार महेंद्र थोरवे यांनी भाष्य केलं आहे.

"नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जी काही मारहाणीची घटना झाली त्या घटनेचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईलच. ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे की, मारहाण करणारा महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड आहे. मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. दोन्ही कार्यकर्ते माझेच आहेत. उलट ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो माझा नातेवाईक आहे. तो ठाकरे गटाचा नाही. मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे," असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे.

मारहाण करणारा आणि मार खाणारा दोघंही आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची कबुली थोरवे यांनी दिली आहे. "दोघांमध्ये काय मतभेद झाले याची मला कल्पना नाही. याची माहिती मी घेत आहे. मारहाण करणाऱ्याशी माझा काही संबंध नाही. मी पोलीस ठाण्यात त्याला कारवाई करुन अटक करण्यास सांगितले आहे," असेही महेंद्र थोरवे यांनी म्हटलं.

Web Title: Shinde group MLA Mahendra Thorve explanation on the beating incident in Neral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.