शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरे यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:11 AM2024-03-24T06:11:38+5:302024-03-24T06:12:05+5:30
कार्यकर्त्यांच्या आरोपानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलो आहोत.
पेण : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे निवडून आल्यानंतर सहकारी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देतात. दुसऱ्या सहकारी मित्रपक्षांना संपविण्यासाठी राजकीय कारनामे करतात, असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या शनिवारी पेणमध्ये झालेल्या आढावा बैठकीत करण्यात आला. या बैठकीत रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार खा. तटकरे यांच्यावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अविश्वास दर्शविला.
कार्यकर्त्यांच्या आरोपानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलो आहोत. महायुतीचे सहकारी म्हणून आम्ही तुमचे काम प्रामाणिकपणाने करू, पण यानंतर येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही सुद्धा आम्हाला त्याच ताकदीने सहकार्य कराल, अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा केली तर ती चुकीची ठरेल का? कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन जर तुमच्यात बदल घडला नाही, तर तुमचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा सूचक इशाराही त्यांनी दिला. बैठकीला आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.