रायगडच्या समुद्रात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:23 AM2020-12-12T02:23:06+5:302020-12-12T02:23:53+5:30
Raigad News : सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचा नजारा सध्या अनुभवण्यास मिळत आहे.
- निखिल म्हात्रे
अलिबाग : सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचा नजारा सध्या अनुभवण्यास मिळत आहे. हा नजारा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक रात्रीच्या वळेस गर्दी करीत आहेत. बुधवारी रात्री नागाव सुमद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलेल्या तरुणांनी या निळ्या रंगाच्या लाटा पाहिल्या आणि आपल्या मोबाइलमध्ये कैद केल्या. मात्र, मत्स विभागाला याबाबत अद्याप काही माहिती नसल्याचे समोर येत आहे.
सायंकाळी काळोख पडल्यानंतर या निळ्या रंगाचा प्रकाश दिसायला लागतो. हळूहळू तो अधिक चमकदार होतो. रात्री अंधारात लाटांबरोबर हेलकावे खाणारा हा निळा प्रकाश डोळ्यांत साठविणे हा एक विलोभनीय अनुभव आहे. समुद्राचे पाणी हातात घेऊन ढवळले तरी हा निळा चमचमता प्रकाश पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यात प्रथमच असा प्रकाश अचानक समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर असा अद्भुत नजारा पाहायला मिळाला होता. सध्या नागावच्या समुद्र किनाऱ्यावर असा अद्भुत नजारा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र असे काही असल्याची माहिती आमच्याकडे नाही, किंवा तशी माहिती स्थानिक मच्छीमार सोसायट्यांकडून अद्याप आम्हाला मिळाली नसल्याचे मत्स व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लगलेट्स या सूक्ष्म जीवांच्या निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लाटा चकाकत आहेत, असा अभ्यासकांचा दावा आहे. तसेच समुद्रात या जिलेट्स सूक्ष्म जीवांची जास्त वाढ होण्यामुळे माशांवर विपरीत परिणाम होत असल्याचेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
सगळे मित्र रात्री ८ च्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. त्या वेळी लाटांबरोबर निळ्या रंगाचा चमचमता प्रकाश दिसला. हा विलक्षण अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला. आमच्या मोबाइलमध्ये त्याचे छायाचित्र कैदही केले. तसेच ही सारी घटना ग्रामपंचायत प्रशासनालाही सांगितली.
- आकाश चंदनशिवे, प्रत्यक्षदर्शी