जंजिरा किल्ल्यासाठी जलवाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:39 AM2020-11-24T00:39:23+5:302020-11-24T00:40:11+5:30
१३ शिडांच्या बोटी, दोन यांत्रिकी नौकांमधून वाहतूक
मुरुड : तालुक्यातील राजपुरी येथे ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील जलवाहतूक सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. १३ शिडांच्या बोटी व दोन यांत्रिकी नैकांच्या साह्याने येथील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. राजपुरी नवीन जेट्टी, खोरा बंदर व दिघी येथून जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक व्यवस्था केली जाते. रायगड जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनसुद्धा महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने जलवाहतूक सुरू न केल्यामुळे हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. परवाने नूतनीकरण व प्रवासी विमा न केल्यामुळे बोर्डाने जलवाहतूक सुरु केली नव्हती. परंतु आता जलवाहतूक सोसायटीने या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे सोमवारपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
मार्च महिन्यापासून किल्ला संचार बंदी काळात बंद करण्यात आला तो अद्यापपर्यंत पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे या किल्ल्यावर उपजीविका अवलंबून असलेले सुमारे २५० लोकांचे संसार धोक्यात आले आहेत. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटीने पर्यटकांना किल्ल्यापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी प्रत्येक शिडाच्या बोटीवर चार ते पाच लोक काम करीत असतात. अशा शिडाच्या बोटी २० पेक्षा जास्त असून या बोटींवर काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगाराचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. आता किल्ला सुरू झाल्याने पुन्हा या लोकांना रोजगार प्राप्त झाला असून हा परिसर सध्या गजबजून गेला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आपल्या चार चाकी गाड्यांसह पर्यटकांचे आगमन झाले होते. बोटधारक, या ठिकाणी व्यसाय करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला .
जल वाहतुकीस मेरी टाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रवाशांसह बोटधारकांनी करावा. त्याचप्रमाणे लवकरच किल्ल्याच्या साफसफाईला मजूर घेऊन सुरुवात करणार आहोत.
- बी.जी. येलीकर, साहाय्यक संवर्धक, पुरातत्त्व खाते, मुरुड जंजिरा