शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांचे अपील आयुक्तांनी फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:05 AM2019-08-15T03:05:37+5:302019-08-15T03:05:52+5:30
ग्रामस्थांच्या सार्वजनिक जमिनीवर अतिक्र मण करून घर बांधणे तसेच विक्र ी करणे, हे प्रकार केल्याचे सिद्ध झाले
अलिबाग - ग्रामस्थांच्या सार्वजनिक जमिनीवर अतिक्र मण करून घर बांधणे तसेच विक्र ी करणे, हे प्रकार केल्याचे सिद्ध झाल्याने अलिबाग तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीचे सरंपच आणि सदस्यांचे अपील कोकण आयुक्तांनी फेटाळले आहे, त्याचप्रमाणे सरपंच आणि सदस्य पदावर राहण्यासही अपात्र ठरवल्याने शेकापला चांगलाच झटका बसल्याचे बोलले जाते. या अपील प्रकरणातील अर्जदार शिरवली येथील ग्रामस्थ श्याम श्रीधर घरत, मनोज गोपाळ म्हात्रे यांनी आयुक्तांचा आदेश रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. अपात्र सरपंच आणि सदस्यांची पदे तत्काळ रिक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिरवलीचे सरपंच प्रमोद तुकाराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्रीती प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मदन कृष्णा म्हात्रे यांना रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी जानेवारी २०१९ मध्ये अपात्र ठरविले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर कोकण विभाग आयुक्तांकडे सरपंचांसह अन्य सदस्यांनी अपील केले होते. त्यावर ७ आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान कोकण आयुक्तांनी अपील फेटाळले आहे. जिल्हाधिकरी रायगड यांचे आदेश कायम ठेवले आहेत.
सरपंच प्रमोद ठाकूर हे आॅक्टोबर २०१७ मध्ये थेट सरपंच म्हणून शेकापकडून निवडून आले होते. सरपंच प्रमोद ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या सार्वजनिक मालकीच्या जमिनीमध्ये बेकायदा घर बांधून त्याची विक्र ी केल्याने त्यांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या, तसेच दंडही आकारण्यात आला असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी अर्जदारांनी केली होती. विवाद अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. ठाकूर यांनी सरकारी जमिनीवर, सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्र मण केल्याचे सिद्ध झाले.
सुनावणीत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार तसेच कुटुंबातील सदस्यांनी केलेले अनधिकृत बांधकामही ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांचे पद रद्द करावे, या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेमधील आदेशाचे पालन करून जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अर्जदार श्याम घरत आणि मनोज म्हात्रे यांचा विवाद अर्ज मान्य केला होता.
निर्णयावर शिक्कामोर्तब
शिरवली ग्रामपंचायतीचे सरंपच प्रमोद तुकाराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्रीती प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मदन कृष्णा म्हात्रे यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले होते. आता आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.