अलिबागमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भाजप कार्यालयासमोर निदर्शने
By राजेश भोस्तेकर | Published: January 11, 2024 07:54 AM2024-01-11T07:54:51+5:302024-01-11T07:55:22+5:30
राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालानंतर रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध केला आहे. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वात अलिबाग येथे भाजप कार्यालयासमोर शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हा निकाल लोकशाहीची हत्या करणारा आहे, देशाचे संविधान पायदळी तुडवण्याचे काम या सरकारने केले आहे. या सरकारचा निषेध जनता रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली.
यावेळी तालुका प्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर, महिला आघाडीच्या प्रमुख राखी खरवले, अजित पाटील, कमलेश खरवले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.