रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून शिवसेना आक्रमक, अभियंत्याच्या चेहऱ्याला काळे फासले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 05:31 PM2021-06-07T17:31:21+5:302021-06-07T17:33:12+5:30
लाखो रुपये खर्च करून भापट येथील नव्याने झालेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा व एक महिना देखील टिकू शकत नाही, असे शिर्के यांच्या निदर्शनास आले.
रायगड/म्हसळा - तालुक्यात रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचा होत असलेली कामे पाहून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी थेट बांधकाम अभियंता डोंगरे यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना गटविकास अधिकारी यांच्या कक्षात घडली. रस्ते विकास व मजबुतीकरण कामा अंतर्गत म्हसळा तालुक्यातील भापट या रस्त्याला सुमारे 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला होता, हा निधी खर्च करून या रस्त्याचे काम 3 जून रोजी पूर्ण झाले असून हा रास्ता 4 जून रोजी वाहून गेल्याचे वृत्त समाज माध्यमावर वाऱ्यासारखे फिरत होते.
समाज माध्यमात आलेल्या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी स्वतः भापट येथे जाऊन रस्त्याची पाहणी केली. लाखो रुपये खर्च करून भापट येथील नव्याने झालेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा व एक महिना देखील टिकू शकत नाही, असे शिर्के यांच्या निदर्शनास आले. भापट येथील रस्ता पाहून झाल्यानंतर शिर्के निकृष्ट दर्जाचे रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती येथे गेले. पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात जिल्हा परिषदेचे म्हसळा बांधकाम विभागातील अभियंता संजय डोंगरे हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी रस्त्याबाबत अभियंता डोंगरे यांनी चुकीची माहिती देत असल्याचा रागातून शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी जनतेचा पैसा आहे हा, पैसाचा योग्य वापर करायला शिकून कामे चांगल्या दर्जाची करा असे सांगून अभियंता संजय डोंगरे यांचा तोंडाला काळे फासले. यावेळी त्यांचा सोबत शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळ करडे, सुरेश कुडेकर, शिवसेना शहर प्रमुख अनिकेत पानसरे, दिपल शिर्के, वाहतूक सेनेचे शाम कांबळे, युवासेना तालुका अधिकारी अमित म्हामूनकर, अक्रम साने, राहुल जैन यांच्यासहित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.