महाडमध्ये सर्व पाच जागांवर शिवसेना
By Admin | Published: February 24, 2017 07:53 AM2017-02-24T07:53:35+5:302017-02-24T07:53:35+5:30
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्व पाचही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळविला
महाड : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्व पाचही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळविला, तर पंचायत समितीच्या दहापैकी नऊ जागा जिंकून पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेस पक्षाला पंचायत समितीमध्ये केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या या ऐतिहासिक विजयामुळे महाड तालुक्याच्या ग्रामीण भागावर शिवसेनेचेच वर्चस्व असल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले. जिल्हा परिषदेच्या वहूर गटातून शिवसेनेचे जितेंद्र सावंत यांनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे इब्राहिम झमाने यांचा केवळ १०१ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.
नाते जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या मैथिली खेडेकर यांनी काँग्रेसच्या पल्लवी देशमुख यांचा पराभव केला. बिरवाडी गटातून शिवसेनेचे संजय कचरे यांनी काँग्रेसचे राजेंद्र खातू यांचा पराभव केला. करंजाडी गटात शिवसेनेचे मनोज काळीजकर यांनी काँग्रेसचे मनोहर रेशीम यांच्यावर विजय मिळवला. करंजाडी पंचायत समिती गणात शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे यांच्या पत्नी निकीता ताठरे यांनी काँग्रेसच्या शुभांगी पवार यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या वहूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य इब्राहिम झमाने यांचा पराभव करत शिवसेनेच्या जितेंद्र सावंत यांनी शेवटच्या क्षणी केवळ १०१ मतांनी विजय मिळविला.
या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा चौरंगी लढती झाल्या असल्या तरी खरी लढत शिवसेना व काँग्रेस उमेदवारांमध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्याने स्पष्ट झाले. शिवसेना आ. गोगावले यांच्या नेतृत्वाखाली, मिळवलेल्या या शंभर टक्के यशामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबवल्याने दुपारी १ वा. सर्व मतमोजणी पूर्ण होऊ शकली.