पनवेल पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:18 AM2019-12-24T02:18:04+5:302019-12-24T02:18:32+5:30
कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना शेकापचे आमदार बाळाराम पाटील
पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग १९ ब साठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप विरोधात सेनेने उमेदवार दिला आहे. सोमवारी स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. भाजपच्या वतीने रु चिता लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यास यश आले नाही. महाविकास आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे यांची मुलगी स्वप्नल कुरघोडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिकेत शिवसेनेचा एकही सदस्य नसल्याने राज्यात महाविकास आघाडीच्या धर्तीवर शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगर पालिकेत सेनेला पनवेल महानगर पालिकेत खाते खोलण्याची संधी दिली आहे.
च्स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना शेकापचे आमदार बाळाराम पाटील, विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, बबन पाटील, माजी नगरसेवक लतीफ शेख, गणेश कडू, हेमराज म्हात्रे आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाणार असून, महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलाचे परिणाम या निवडणुकीवर निश्चितच पाहायला मिळतील, असे त्यांनी सांगितले. ९ जानेवारी रोजी मतदान प्रक्रि या पार पडणार आहे, तर १० जानेवारी रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.