'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:34 AM2019-04-20T05:34:10+5:302019-04-20T05:34:32+5:30
शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे.
माणगाव : शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. रायगड लोकसभेमध्ये वादळ निर्माण झाले असून, या वादळामध्ये धनुष्यबाणाचे किती तुकडे होतील व कमळाबाईच्या किती पाकळ्या होतील, हे चित्र येथील जनतेला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी के ले.
माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे रायगड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,काँग्रेस, शेकाप, पीआरपी (कवाडे गट), आरपीआय (गवई गट), मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सभेसाठी मुंडे गुरूवारी आले होते. धनंजय मुंडे म्हणाले की, २०१४ मध्ये मोदीलाट होती; परंतु आपल्या गाफीलपणामुळे सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता २०१९ मध्ये संधी मिळाली असून, तटकरेंना सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्याची हीच वेळ आहे. मी राज्यामध्ये अनेक सभा घेतल्या; परंतु मोदीलाट कुठे दिसली नाही. मागील निवडणुकीमध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत होते; परंतु आता अच्छे दिनाची चेष्टा गावांमध्ये, शहरांमध्ये होऊ लागली आहे.
नितीन गडकरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, अच्छे दिन बिच्छे दिन कुछ नही होता, उसको महसूस करना होता है, अशा प्रकारे हे जनतेची फसवणूक करीत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते म्हणाले की, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, मुख्यमंत्री झाला नाहीत तरी तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली याची इडीमार्फत चौकशी करण्यात येईल. सुनील तटकरेंना बदनाम करण्याचा कट यांनी केला आहे. अनंत गीते हे केंद्रात विविध पदांवर असताना काम करण्याची संधी मिळाली होती; परंतु त्यांच्याकडून विकासाचे प्रश्न सुटले नाहीत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून, यांचा संबंध थेट मातोश्रीही आहे. १५ वर्षांच्या नवसाने सरकार आले आणि मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकार गेले, अशी वेळ यांच्यावर आली आहे.
देशाच्या लोकशाहीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या देशामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. कोकणची जनता सुज्ञ असून, तटकरे हे केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतीलच असा विश्वास व्यक्त केला.
>भाजप व शिवसेनेवर टीका
पाच वर्षांत मोदी सरकारने जनतेची लूट केली. नीरव मोदी २४ हजार कोटी, ललित मोदी आठ हजार कोटी, चोकसी, विजय मल्ल्या हे पळून गेले, तेव्हा देशाचे चौकीदार हेच होते. राफेल घोटाळा, व्यापमं घोटाळा, महाराष्ट्रातील १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटी खाल्ले, याचे उत्तर देशाला द्यावेच लागणार आहे. पहारेकरी व चौकीदार हे दोघेही चोर असल्याटी टीका धनंजय मुंडे यांनी केली.