मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 06:06 AM2022-02-23T06:06:06+5:302022-02-23T06:07:07+5:30

पालकमंत्री हटाव मोहिमेवरून नाराजीनाट्य; ठाकरेंकडून आदिती तटकरे यांचे कौतुक 

Shiv Sena boycotts CM uddhav thackerays program demanding to change guardian minister | मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार!

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार!

Next

रायगड : अलिबाग-उसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असूनही  जिल्ह्यातील आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकत पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आणली. त्याचवेळी ठाकरे यांनी मात्र ही मोहीम उघडणाऱ्यांची दखल न घेता  पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत पक्षातील तिन्ही बंडखोर आमदारांना एकप्रकारे चपराक लगावली. 

ज्या कार्यक्रमांना पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे असतील, त्या कार्यक्रमांना जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार नाहीत, असे अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आधीच घोषित केले होते. आदिती काेणालाच विश्वासात घेत नाहीत, कामात सातत्याने लुडबुड करतात. त्यामुळे शिवसेनेत असलेली नाराजी काही दिवसांपूर्वी बाहेर पडली. पक्षाचे आमदार महेंद्र दळवी, भरत गाेगावले आणि महेंद्र थाेरवे यांनी पालकमंत्री हटाव मोहीम सुरू केली.

मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडले
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. त्यावर पक्षाने काहीही निर्णय घेतला नसल्याने जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन साेहळ्याला तिन्ही आमदारांसह कार्यकर्त्यांनी दांडी मारत मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडले.  

ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित राहात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाची प्रशंसा केली. काम पूर्णत्वास नेणे ही आदिती तटकरे यांची खासियत आहे. 
अमुक काम करा, तमुक काम करा असे सर्वच सांगतात; परंतु त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पाडले, अशा शब्दांत स्तुती करत त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना इशाराच दिल्याचे मानले जाते.  

कार्यक्रम महाविकास आघाडीचा आहे, मुख्यमंत्री हेदेखील आमचेच आहेत; परंतु जिल्ह्यातील कारभारामध्ये पालकमंत्री आदिती तटकरे यांची लुडबुड सुरू आहे. याविराेधात आमदार महेंद्र थाेरवे, आमदार भरत गाेगावले यांच्यासह मी स्वत: पालकमंत्री हटावची माेहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला गैरहजर राहिलाे.
महेंद्र दळवी, आमदार.


अलिबाग-उसर जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी जे. जे. रुग्णालयातून प्रतिनियुक्तीवर पाठविलेले ४५  डॉक्टर हजर न झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीच्या अभ्यासक्रमावर परिणाम होणार असल्याचे रायगड जिल्हा सरकारी वैद्यकीय रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. महेंद्र खुरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होत असताना ३५ दिवसांपासून सर्व वैद्यकीय शिक्षक मागण्यांसाठी आणि न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने आणि सचिवांच्या भूमिकेमुळे नाराज डॉक्टरांनी या कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय जाहीर केला होता. अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ७६ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

गोंदिया, नंदुरबार, सातारा, सिंधुदुर्ग, अलिबाग येथे नवी महाविद्यालये उभारली जात आहेत. नव्याने सुरू होत असलेल्या सर्व महाविद्यालयांत जे वैद्यकीय शिक्षक दाखवले जात आहेत, ते इतर कॉलेजमधून प्रतिनियुक्तीने आणले जात आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नव्याने सुरू होणारी कॉलेज कधीच सक्षम वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा देऊ शकणार नाहीत, असे मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावर म्हणाले.

खासगीकरणाकडे ओढा नाही ना!
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असूनही त्यांचा सेवेत समावेश न करण्यामागे सरकारचा खासगीकरणाकडे ओढा नाही ना, अशी शंका डॉ. दिनेश धोडी यांनी व्यक्त केली.

Web Title: Shiv Sena boycotts CM uddhav thackerays program demanding to change guardian minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.