पाली : संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष तालुका पातळीवर आघाड्या, युत्यांची सांगड घालण्यात व्यस्त आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी समीकरणे झालेली आहेत. कारण कोणताच पक्ष या निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणू शकत नाही त्यासाठी ही जमवाजमव सुरू आहे. यात पेण तालुक्याने मात्र बाजी मारली आहे. पाली येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांच्या फार्मवर नुकत्याच झालेल्या पेण तालुक्यातील काँग्रेस व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचे एकमताने ठरल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई व राजिपचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पाली येथे गुरु वारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पेण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेस यांच्यात युती झाली असून या निवडणूक समझोत्यावर शिक्कामोर्तब झाल्याची अधिकृत घोषणा केली. शिवसेना सहा तर काँग्रेस नऊ जागा लढविणार आहे, त्या उमेदवारांची नावे देखील जाहीर केली.यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार किशोर जैन, शिवसेना पेण तालुकाप्रमुख मोकल, माजी जिल्हाप्रमुख सुधा भोय, अविनाश म्हात्रे, विकास म्हात्रे, वासुदेव म्हात्रे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवसेना- काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब !
By admin | Published: January 28, 2017 2:58 AM